नवी दिल्ली – चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कर्ज आणि ठेवींच्या टक्केवारीत पुणे स्थित बॅंक ऑफ महाराष्ट्र ही राष्ट्रीयकृत बॅंक देशातील अन्य राष्ट्रीयकृत बॅंकांच्या तुलनेत अव्वल कामगिरी करणारी बॅंक म्हणून उदयास आली आहे.या बॅंकेच्या ठेवी आणि कर्जाच्या रकमेत या तिमाहीत जवळपास 25 टक्के वाढ नोंदवली गेली आहे, जी एप्रिल-जून तिमाहीत कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकेपेक्षा सर्वाधिक आहे.
24.98 टक्क्यांच्या वाढीसह बॅंकेची एकूण कर्जे जून 2023 अखेर 1,75,676 कोटी रुपये इतकी वितरीत झाली आहेत. युको बॅंक दुसऱ्या स्थानावर असून त्यांची वाढ 20.70 टक्के, बॅंक ऑफ बडोदाची 16.80 टक्के आणि इंडियन ओव्हरसीज बॅंकेची वाढ 16.21 टक्के इतकी नोंदवली गेली आहे. देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी बॅंक असलेली स्टेट बॅंक ऑफ इंडिया 15.08 टक्के वाढीसह पाचव्या स्थानावर आहे.एसबीआयने वितरीत केलेल्या एकूण कर्जाची रक्कम 28,20,433 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.
ठेव वाढीच्या संदर्भात, बॅंक ऑफ महाराष्ट्रने 24.73 टक्के वाढ नोंदवली आणि जून 2023 अखेरीस 2,44,365 कोटी रुपये एकूण ठेवी प्राप्त केल्या आहेत. बॅंक ऑफ बडोदा 15.50 टक्क्यांच्या वाढीसह (रु. 10,50,306 कोटी) दुसऱ्या स्थानावर आहे, तर पंजाब नॅशनल बॅंकेने ठेवींमध्ये 13.66 टक्क्यांनी वाढ करीत तिसरा क्रमांक मिळवला आहे.