विशाल बेंद्रे निघाला मुख्य सूत्रधार
पुणे – देशभरातील कॉर्पोरेट कंपन्यांच्या खात्यांची माहिती चोरुन त्याची विक्री करत सव्वादोनशे कोटी रुपयांचा अपहार करण्याचा डाव सायबर पोलिसांनी उधळला. याप्रकरणी बुधवारी सायंकाळपर्यंत नऊ जणांना अटक, तर दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विशाल बेंद्रे, तर केंद्रबिंदू अनघा मोडक असल्याचे तपासात उघड झाले आहे.
…म्हणून अनघाने रचला कट
अनघा मोडक ही स्टॉक ब्रोकर म्हणून काम करते. तिला यापूर्वी स्टॉक मार्केटमध्ये मोठा तोटा सहन करावा लागला आहे. यामुळे ती लोकांची कोट्यवधी रुपयांचे देणे आहे. तिने दिलेले काही धनादेश बाऊंस झाल्याने तिच्याविरुद्ध काही महिन्यांपूर्वी गुन्हाही दाखल झाला आहे. दरम्यान, तिची ओळख स्कॅमचा मुख्य सूत्रधार विशाल बेंद्रेशी झाली. अनघा त्याच्याकडून डाटा घेऊन तो एका बंद पडलेल्या न्यूज चॅनेलच्या मालकाला विकणार होती. या न्यूज चॅनेलच्या दोघा मालकांकडून डाटा आणि बॅंक खात्यावरील रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी ती अडीच कोटी रुपये घेणार होती. मात्र, दोघांकडे इतके पैसे नसल्याने ते पंचवीस लाखांची रोकड घेऊन तिला देण्यासाठी आले होते.
मंकणीला काढायची होती वेब सिरीज
रोहन मंकणी हा एका राजकीय पक्षाच्या सेलचा पदाधिकारी आहे. तो चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे. त्याला एक वेब सिरीज काढायची होती. यासाठी त्याला पैशांची आवश्यकता होती. तो अनघासोबत मध्यस्थ म्हणून काम करत होता. मात्र, तो त्याच्या इतर भूमिकेविषयी माहिती देत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीसच बनले हॅकर, फिरले अनघासोबत
अनघा बॅंक डाटाच्या माध्यमातून पैसे वर्ग करण्यासाठी हॅकर्स शोधत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावर सायबर सेलचे काही अधिकारीच हॅकर्स म्हणून तिच्या संपर्कात आले. ती या कर्मचाऱ्यांना गाडीत बसवून न्यूज चॅनेलच्या दोघा भागिदारांना भेटण्यासाठी गाडीतून जात होती. तेव्हा ती फोनवरुन “अडीच कोटी दिल्याशिवाय डाटा देणार नाही’ अशा व्यवहाराच्या गोष्टी करत होती. मात्र, न्यूज चॅनेल बंद पडलेला असल्याने दोघेही भागिदार 25 लाखांचीच रक्कम घेऊन आले होते. त्यामुळे सौदा जवळपास मोडलाच होता.
…अन् मुसक्या आवळल्या
हा सौदा मोडत असताना अनघाला जाऊ दिले, तर आपल्या हाती काहीच लागणार नाही हे पोलिसांना माहिती होते. यामुळे तातडीने अनघा व दोघांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांच्या संपर्कात असलेल्यांना एक-एक करत पोलिसांच्या पथकाने इतर आरोपींनाही जेरबंद केले. न्यूज चॅनेलच्या दोघेही भागिदार चॅनेल बंद पडल्याने मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांचा लाखो रुपयांचे वेतनही थकले होते. यामुळे त्यांनी हा डाटा विकत घेऊन पैसे वर्ग करुन घेण्यासाठी ते एका आरोपीमार्फत अनघाच्या संपर्कात आले होते.