प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 9 -शहरात गणेशमूर्ती विक्रीच्या स्टॉलसाठी महापालिकेकडून क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर पार्किंगसाठी जागा असलेली तसेच वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशी मोकळी मैदाने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरात कोणत्याही प्रमुख अथवा छोट्या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे स्टॉल उभे राहिल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तसेच शहरात महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या आदेशानुसार “पीओपी’च्या मूर्ती विक्रीस बंदी घालण्यात आली असून, या नियमाची अंमलबजावणी कडक स्वरुपात केली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, शहरात अद्याप कोणत्याही गणेशमूर्ती विक्री स्टॉलला परवानगी देण्यात आलेली नसल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी स्पष्ट केले. शहरात गणेशोत्सव जवळ येताच गणेशमूर्ती विक्री स्टॉलना महापालिकेकडून परवानगी दिली जाते. त्यासाठी पालिका मोकळी मैदाने तसेच पार्किंगची सोय असलेली जागा उपलब्ध करून देते. रस्त्यावर असे स्टॉल असल्यास वाहतूक कोंडी आणि अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिकेकडून या उपाययोजना केल्या जातात.
मात्र, अनेक जण विनापरवाना रस्त्याच्या कडेला स्टॉल लावतात. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या वाहनांमुळे रस्त्यावर गर्दी होते. तर जे विक्रेते नियमांचे पालन करून पालिकेच्या जागांमध्ये स्टॉल टाकतात, तिथे गणेशभक्त येत नाहीत. त्यामुळे हे विक्रेते नाराजी व्यक्त करत मुख्य रस्त्यावरच परवानगी मागतात. त्यामुळे पालिकेने अशा अनधिकृत स्टॉलवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, रस्त्याच्या कडेला असे स्टॉल आढळल्यास फौजदारी कारवाई करणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.