इस्लामाबाद – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील शिक्षकांनी मॅट्रिकच्या परीक्षेवर बहिष्कार घातला आहे. पगारवाढीच्या मागणीसाठी शिक्षकांनी ही भूमिका घेतली आहे तसे बलुचिस्तानच्या शिक्षण विभागाने म्हटले आहे.
“बलुचिस्तान एम्पलॉइज अंड वर्कर्स ग्रॅंड अलायन्स’ या संघटनेने शिक्षकांच्या पगार वाढीची मागणी केली आहे. पाकिस्तान मधील मॅट्रिकच्या परीक्षा आज पासून सुरू झाल्या आहेत. चमन भागातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी परीक्षेसाठी जमा झाले. मात्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटल्या नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर ताटकळत उभे रहावे लागले. पगारवाढीची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत परीक्षांवरील बहिष्कार कायम ठेवण्याचे धोरण शिक्षकांनी स्वीकारले आहे. शिक्षकांनी धरणे आंदोलनही सुरू केले आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला बलुचिस्तान आतील सरकारी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसाठी आंदोलन केले होते. त्यामुळे या भागाचा अन्य देशांबरोबरचा संपर्क तुटला होता. गेल्या आठवड्यात बलुचिस्थान सरकारने क्वेट्टा जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू केले आणि सर्व प्रकारच्या एकत्रीकरणावरही बंदी घातली. शिक्षकांनी आंदोलनाचा इशारा दिला असल्यानेच ही कारवाई करण्यात आली. गेल्या महिन्यात शेकडो शिक्षकांनी पगारवाढीच्या मागणीसाठी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये मुजफ्फराबाद येथे आंदोलन केले होते. त्याच वेळी सर्व सरकारी कामांवर, निवडणुकीच्या कामावर आणि मॅट्रिकच्या परीक्षेवरही बहिष्कार घालण्याचा इशारा शिक्षकांनी दिला होता.