भुवनेश्वर – ओडिशामध्ये करोना रुग्णांची संख्या वाढायला लागल्याने ओडिशा सरकारने छत्तीसगड राज्याबरोबरची सीमा सीलबंद केली आहे. सीमा भागातील वाहतुकीवर बारीक देखरेखही ठेवण्यात येत आहे.
छत्तीसगडला लागून असलेल्या ओडिशातील काही जिल्ह्यांमध्ये अलिकडच्या काही दिवसात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्याची सीमा ओलांडून ओडिशामध्ये येणाऱ्या प्रवाशांनी आगोदर आपल्या करोना चाचणीचा “निगेटिव्ह रिपोर्ट’ सादर करणे स्थानिक प्रशासनाने अनिवार्य केले आहे.
करोनाच्या साथीच्या पार्श्वभुमीवर जे नागरिक कठोर नियमांचे आणि उपाय योजनांचे पालन करणार नाहीत, त्यंच्यावर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव एस.एल. मोहापात्रा यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. मास्क न घालणाऱ्या आणि कोविड-19 अनुकुल वर्तन न करणाऱ्या नागरिकांच्या दंडाची रक्कम दुप्पट करण्याचे आदेश मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दिले आहेत.
छत्तीसगडमधून ओडिशामध्ये प्रवासी कामगारांच्या प्रवेशामुळे करोनाच्या साथीत वाढ होऊ नये यासाठी या कामगारांना रोखण्यात येत असून सीमा सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.