तेहरान – इराणमध्ये करोना विषाणूमुळे पसरलेल्या साथीची चौथी लाट सुरू झाली असल्यामुळे शनिवारपासून 10 दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. मध्यपूर्वेतील देशांपैकी इराणमध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव सर्वाधिक झालेला आहे. अजूनही तेथील साथ आटोक्यात येण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. प्रशासनाने संसर्गाचे प्रमाण अधिक असलेल्या भागांना “रेड झोन’ घोषित करून तेथील दुकाने आणि कार्यालये बंद करण्याचे आदेश दिले आहेत. राजधानी तेहरान आणि देशभरातील अन्य 250 शहरांना “रेड झोन’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.या शहरांमध्ये रुग्णांच्या संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे तेथे लागू केलेले निर्बंधही अधिक कडक आहेत. देशातील 85 टक्क्यापेक्षा अधिक भाग “रेड’ किंवा “ऑरेंज’ झोनमध्ये आहे. नवीन लॉकडाऊनचा परिणाम सर्व उद्याने, रेस्टॉरंट्स, बेकरी, ब्युटी सलून, मॉल्स आणि बुक स्टोअरवर देखील झाला आहे.
पारशी नववर्ष अर्थात नौरोझच्या दोन आठवड्यांच्या सुटीनंतर या संसर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या सुटीच्या काळात नागरिक मोठ्या संख्येने पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी गेले होते. तसेच खरेदीसाठी बाजारपेठांमध्येही गर्दी झाली होती. इराणमध्य् लसीकरणाला सुरुवात झाल्यावर संसर्ग आटोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत होती. 8 कोटी 40 लाख लोकसंख्या असलेल्या इराणमध्ये आतापर्यंत केवळ 2 लाख डोस वितरीत केले गेले आहेत.