इस्लामाबाद- पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने फेब्रुवारी 2019मध्ये बॉम्बहल्ला करून उद्ध्वस्त केलेला दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय करण्यात आला आहे.
बालाकोटमधील दहशतवाद्यांच्या तळावर पाकिस्तानच्या आयएसआयने जैश-ए-महंमद या संघटनेच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती. भारतीय हवाई दलाने त्यावर एअर स्ट्राईक करून तो उद्ध्वस्त केला होता. हा तळ भारतात घुसवायच्या दहशतवाद्यांसाठी बनवण्यात आला होता.
गुप्तचर खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानात नाटो राष्ट्रांच्या फौजांविरोधात लढणारा जैश-ए-महंमदचा कमांडर जुबेर याच्यावर येथील दहशतवाद्यांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी सोपवली आहे. जुबेर लष्करी आस्थापनांवर दहशतवादी हल्ले घडवण्यात सराईत आहे.
बालाकोटच्या नव्याने उभारलेल्या तळावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याचा वापर जैश आणि अन्य संघटनांच्या दहशतवाद्यांना भारतात घुसवण्यासाठी केला जात आहे. त्यांनी नियंत्रण रेषा ओलांडल्यावर त्यांना पाकिस्तानातील हॅंडलर तेथून सूचना देत असतो.
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात खोलवर जाऊन 26 फेब्रुवारी 2019 ला या दहशतवादी तळावर एअर स्ट्राईक केला होता. पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ल्यात 40 जवान मरण पावले होत. त्याचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता.