बंगळूरू : येथील फ्रिडम पार्कवर निदर्शने करणाऱ्यांपुढे एमआयएमचे नेते आसादुद्दीन ओवेसी यांच्या भाषणाआधी पाकिस्तान झिंदाबाद अशी घोषणा देणाऱ्या अमुल्या लिओना या युवतीच्या पालकांच्या घरावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. या घटनेबाबत तिच्या पालकांना जाब विचारला.
या युवतीचे पालक चिकमंगळूरमधील कोप्पा तालुक्यातील शिवपुरा या गावात राहतात. तेथे ही निदर्शने करण्यात आली. या निदर्शकांपुढे बोलण्यास उभारल्यानंतर ती मी पाकिस्तान झिंदाबादचा अर्थ सांगते असे म्हणत होती. तेवढ्यात जमावाने तिच्या हातातून माईक हिसकावून घेतला. त्यामुळे तिला नेमके काय म्हणायचे होते हे स्पष्ट होऊ शकले नाही. ओवेसी येईपर्यंत तीने तीन वेळा पाकिस्तान झिंदाबाद म्हटले. त्यावेळी ओवेसी व अन्य नेत्यांनी तिच्या हातातील माईक हिसकावून घेतला. मला माईक द्या मला बोलू द्या असे अमुल्या म्हणत आहे. त्यानंतर ती हिंदुस्तान झिंदाबाद म्हणते. त्यावेळी व्यासपीठावरील नेते आणि पोलिस त्यांना घेऊन जाऊ लागतात. त्यावेळी हिंदुस्तान झिंदाबाद आणि पकिस्तान झिंदाबाद मधील फरक… असे ती म्हणत असल्याचे ऐकू येते, असा हा व्हिडिओ प्रसारीत झाला आहे. मात्र ती तिने वाक्य पूर्ण करण्याआधीच तिला घेऊन जातात.
या घटनेनेन राज्यभर खळबळ उडाली. त्यामुळे संतप्त झालेल्या बजरंग दलांच्या कार्यकर्त्यांचे पथक रात्री तिच्या घरी गेले. त्यांनी असभ्य भाषेत तिच्या वडिलांना जाब विचारला. कार्यकर्ते घटना स्थळावरून गेल्यानंतर त्यांच्या घरावर तुफानी दगडफेक झाली. अमुल्याचे वडील योगायोगाने हुबळीतील हरीहरापूर येथे जनता दल धर्मनिरपेक्षचे अध्यक्ष आहेत. त्यांना धमकावण्यात आले. त्यावेळी बजरंग दल आणि पित्याच्यात झालेला संवाद पुढील प्रमाणे :
बजरंग दल कार्यकर्ते : तुमच्या मुलीचे वाक्य योग्य वाटतेय का?
पिता : नाही मी त्याला मान्यता देत नाही. निश्चितपणे काही तरी चूक झाली असावी.
बजरंग दल कार्यकर्ते : तुम्ही तिला पुन्हा घरी घेणार का?
पिता : हो… ति माझी मुलगी आहे… ( येथे गोंधळाला सुरवात होते.)
बजरंग दल कार्यकर्ते : म्हणजे तुम्ही राष्ट्रद्रोह्याला घरात प्रवेश देणार?
पिता : नाही, मी तिला लगेच घरी आणणार नाही. तिला काही काळ कारागृहात राहू दे
यावेळी बजरंग दल कार्यकर्ते हिंसक बनतात. त्यातील एकजण खेकसत म्हणतो, तुला कळतंय का तु काय बोलतोस? आम्ही अजून तुझं घर पाडलं नाही या बद्दल आभार मान. तुला बॉम्ब बांधला नाही ते बघ.
पिता : (काय प्रतिक्रिया द्यावी हे त्यांना समजत नाही. ते फक्त मान डोलावतात)
बजरंग दल कार्यकर्ते : तिच्यावर केंद्राने काय कारवाई करावी असे तुला वाटते?
पिता : तिला कारागृहात डांबा. कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई होऊ द्या. मला त्यात काही अडचण नाही.
बजरंग दल कार्यकर्ते : तु कसली मुलगी वाढवलीस? दहा दिवसांपुर्वी तिने मोदींच्या विरोधात भाषण केले याची तुला माहिती आहे का?
पिता :हो मला माहित आहे. फक्त मीच नव्हे आमचे सारे कुटुंबीय त्यामुळे चिंतीत होते. ती नेहमीच बंडखोर होती. ती आपल्या शब्दापासून कधी मागे फिरत नाही. (खजील स्वरात म्हणतात) तिच्या भोवती काही मुस्लीम फिरत असल्याने त्यांच्या प्रभावाखाली ती हे बोलली.
बजरंग दल कार्यकर्ते : आता का आवाज खाली आला. तुझी मुलगी म्हणाली, तू मोदी विरोधात बोलतेस तेंव्हा तू सुरक्षित आहेस याची खात्री करून घे, असे तू म्हणालास. तुला काय वाटते तू भारतात रहात आहेस की पाकिस्तानात? आम्ही हिंदुस्तानवर प्रेम करतो. आम्ही हिंदु आहोत. देशावर तुझे प्रेम आहे की नाही?
पिता : मी पण हिंदु आहे. माझेही माझ्या देशावर प्रेम आहे. माझा तिच्याशी पाच दिवसांपासून संपर्क झाला नाही. ही चळवळ सोडून दे म्हणून समजावण्यासाठी मी काही दिबस बंगळुरात तिच्यासोबत राहिलो होतो. मी परत आलो पण तीने ऐकले नाही. मी हृदयविकाराचा रुग्ण आहे, मला दवाखान्यात ने असेही मी तीला म्हणालो. पण ती आली नाही.
बजरंग दल कार्यकर्ते : म्हण हिंदुस्तान झिंदाबाद… मोठ्यांदा… खणखणीत आवाजात म्हण
पिता : हिंदुस्तान झिंदाबाद…