पुणे: मेकर ऍग्रो इस्टेट प्रा.लि. नावाने कंपनी उघडून विविध योजना आणि बक्षिसांच्या माध्यमातून आकर्षक परतावा देण्याच्या अमिषाने गुंतवणूकदारांची 4 कोटी 19 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक
केल्याप्रकरणात एकाला सत्र न्यायाधीश एस.एस.गोसावी यांनी जामीन मंजुर केला आहे.
भास्कर बाबुराव लिमकर असे त्याचे नाव आहे. त्याने पुणे बार असोसिएशनच्या खजिनदार ऍड. भाग्यश्री गुजर-मुळे आणि ऍड. सुधीर मुळे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. गुंतवणूकदारांची रक्कम परत न दिल्याने त्याच्यावर एमपीआअयडी कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन, त्याला अटक झाली होती. दोन वर्षाहून अधिक काळापासून तो न्यायालयीन कोठडीत होता. या प्रकरणात लिमकर याने जामिनासाठी अर्ज केला होता.
लिमकर हा कंपनीचा समन्वयक अथवा कोणत्याही पदावर कार्यरत नव्हता. त्याच्या बॅंक खात्यावर कंपनीची अथवा गुंतवणूकदारांची कोणतीही रक्कम जमा झालेली नाही. कोणत्याही गुंतवणूकदाराने त्याला रोख रक्कम दिलेली नाही, असा युक्तीवाद ऍड.सुधीर मुळे यांनी केला. यावर पूर्वपरवानगीशिवाय महाराष्ट्र न सोडण्याच्या अटीवर न्यायालयाने त्याला 50 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला.