पुणे: प्रकरण मिटविण्यासाठी 10 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडलेल्या पोलीस नाईकला जामीन झाला आहे. एसीबीच्या कार्यालयात दर शुक्रवारी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत जानेवारी 2020 पर्यंत हजेरी लावण्याच्या अटीवर सत्र न्यायाधीश एस.आर. नावंदर यांनी हा निकाल दिला आहे.
भरत सोनू बांगर (वय 28, रा. मोशी) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. बी.ए. आलुर आणि ऍड. रणजित ढोमसे पाटील यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. याबाबत मावळ तालुक्यातील 55 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे पत्रा बसविण्याचे काम करतात.
त्यांना भोसरी एमआयडीसी येथील एका कंपनीत जुना पत्रा काढून नवीन बसविण्याचे काम मिळाले होते. ते एका व्यक्तीला दिले होते. तो काम करत असताना वरून पडून जखमी झाला होता. फिर्यादींने त्याच्यावर उपचारही केले होते. त्यानंतर तो तक्रार देऊन इच्छित आहे. ते मिटविण्यासाठी बांगर याने लाच मागितली होती.
या प्रकरणात पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर ऍड. आलुर यांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने मंजुर केला.