मोठ्या स्पर्धांत पात्र होणे आवश्‍यक

बायचुंग भूतियाने व्यक्‍त केली अपेक्षा

नवी दिल्ली –भारतीय फुटबॉलची प्रगती साधण्यासाठी संघातील खेळाडूंनी सातत्याने आशिया चषक तसेच फिफा युवा विश्‍वकरंडकासारख्या मोठ्या स्पर्धांसाठी पात्र होणे अत्यंत आवश्‍यक आहे, असे मत भारताचा माजी कर्णधार व अव्वल फुटबॉलपटू बायचुंग भूतिया याने व्यक्‍त केले आहे.

सध्याचा संघ पाहिला तर गेल्या पाच वर्षांत सातत्याने गुणवान खेळाडू गवसले आहेत. आता याच खेळाडूंनी आणखी मेहनत घेत आशियाइ स्तरावर आपला दबदबा निर्माण करण्यासाठी प्रत्येक सामन्यात क्षमतेपेक्षाही जास्त सरस खेळ करणे गरजेचे आहे. आशिया खंडातील सर्वोत्तम संघांशी सातत्याने सामने खेळले पाहिजेत. इतकेच नाही तर भारतीय फुटबॉल महासंघाने या खेळाचा प्रसार तळागाळापर्यंत पोहोचवला पाहिजे तरच दर्जेदार खेळाडू मिळतील. त्यांच्यातूनच आंतरराष्ट्रीय पातळीवर अव्वल संघ म्हणून आपली छबी निर्माण होईल, असेही मत त्याने व्यक्‍त केले.

सध्याच्या काळात परदेशी संघांच्या धर्तीवर आपल्याही खेळाडूंना जागतिक पातळीवरील सुविधा मिळतात. आता खेळाडूंनी याबाबत तक्रारच करू नये, अशी भूमिका महासंघ निश्‍चितच घेत आहे. केवळ कार्यालयीन स्तरावर उहापोह करत राहण्यापेक्षा खेळावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. कामगिरीचा आलेख सातत्याने वाढता दिसला पाहिजे. भारतीय संघ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये जसा खेळ करतो तो पुरेसा नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी योग्य नियोजन व प्रत्यक्ष सामन्यात त्याची अंमलबजावणी करता आली पाहिजे तरच यश मिळेल. त्यासाठी पात्रता स्पर्धांमध्ये अत्यंत जबाबदारीने कामगिरी करत आशिया तसेच विश्‍वकरंडक स्पर्धंमध्ये पात्र होण्यासाठी जीवाचे रान करणे आवश्‍यक आहे, तरच भारताकडे जागतिक स्तरावरचा सर्वोत्तम संघ म्हणून पाहिले जाईल. इंडियन सुपर लीग फुटबॉलला प्रारंभ झाल्यावर तर संघाकडे सेकंड बेंचही चांगला मिळत आहे, असेही भूतियाने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.