टोकियो – भारताची ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने ऑलिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत थाटात विजय मिळवला.
महिला एकेरीच्या रविवारी झालेल्या सामन्यात सिंधूने इस्रायलच्या सेनिया पोलिकारपोवा हिला केवळ 28 मिनिटांत पराभूत केले. क्रमवारीत 7 व्या स्थानावर असलेल्या सिंधूने 58 व्या मानांकित पोलिकारपोवाला 21-7, 21-10 असे पराभूत केले.
आता दुसऱ्या फेरीत सिंधूची लढत ही 34 व्या स्थानावर असलेल्या हॉंकॉंगच्या चियुंग एंगान यी हिच्याशी होणार आहे. या स्पर्धेत सिंधूला सोपा ड्रॉ मिळाला असून, दुसऱ्या फेरीच्या सामन्यातही तिचेच पारडे जड मानले जात आहे.
सलामीच्या सामन्यात सिंधू 3-4 अशी पिछाडीवर होती. मात्र, नंतर तिने खेळ उंचावताना ही गेम 21-7 अशी जिंकली. सिंधूने क्रॉसकोर्ट स्मॅशचा वापर करत पोलिकारपोवाला खूपच दडपणाखाली ठेवले. तिने आपले वर्चस्व कायम राखताना दुसरी गेम 21-10 अशी जिंकली व थाटात दुसरी फेरी गाठली.