पुणे : दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसने आयसीसी अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करत क्रिकेट विश्वात आपला ठसा उमटवला आहे. बेबी एबी डिव्हिलियर्स या नावाने प्रसिद्ध असलेल्या ब्रेव्हिसने या स्पर्धेत चार सामन्यांत 362 धावा केल्या. तो या स्पर्धेच्या साखळी टप्प्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
ब्रेव्हिसच्या फलंदाजी शैलीची तुलना एबी डिव्हिलियर्सशी केली जात आहे. त्यामुळे अनेक लोक त्याला बेबी एबी नावाने हाक मारत आहेत. असे असले तरी अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडकडून पराभव झाल्याने ब्रेविसचा विश्वचषकातील प्रवास संपुष्टात आला आहे. यंदाच्या विश्वचषकातील चमकदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या लेखातून डेवाल्ड ब्रेविसविषयीच्या खास बाबींवर प्रकाश टाकणार आहोत.
1) अंडर-19 विश्वचषकात सर्वाधिक धावा
दक्षिण आफ्रिकेचा संघ 2022 अंडर-19 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. डेवाल्ड ब्रेविसने त्याच्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. डेवाल्ड ब्रेव्हिस यंदाच्या विश्वचषकात चार सामने खेळला आहे आणि चारही सामन्यांमध्ये त्याने 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये 65, 104, 96 आणि 97 धावांचा समावेश आहे. त्याने चार सामन्यांत 90.50 च्या सरासरीने 362 धावा केल्या आहेत. या स्पर्धेत सलग चार पन्नास प्लस धावा करणारा तो पहिला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज आहे.
2) शतकांची हॅट्ट्रिक हुकली
यंदाच्या विश्वचषकात ब्रेव्हिसची आयर्लंड (97 धावा) आणि इंग्लंडविरुद्ध (96 धावा) शतके हुकली. अन्यथा या स्पर्धेत सलग तीन शतके झळकावण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला असता. असे असले तरी, अंडर-19 विश्वचषकात सलग चार 50+ धावा करणार्या खेळाडूंच्या यादीत त्याचे नाव नोंदले गेले आहे. याआधी, बांगलादेशचा मेहदी हसन मेराज (2016), भारताचा शुभमन गिल (2018) आणि यशस्वी जैस्वाल (2020) यांनी अंडर-19 विश्वचषकात सलग चार अर्धशतके झळकावली आहेत.
3) गोलंदाजीतही कमाल
ब्रेव्हिस त्याच्या दमदार फलंदाजीसह गोलंदाजीतही तो सातत्याने बळी घेत आहे. उजव्या हाताने लेगस्पिन गोलंदाजी करणार्या ब्रेव्हिसने आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत एकूण 6 बळी घेतले आहेत. युगांडाविरुद्ध 18 धावांत 2 बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याला 2-2 बळी घेण्यात यश आले होते. आयर्लंडविरुद्ध गोलंदाजी करताना त्याला विशेष यश मिळाले नाही. स्पर्धेतील फलंदाजी आणि गोलंदाजीच्या कामगिरीमुळे ब्रेविस मालिकावीराच्या पुरस्काराच्या शर्यतीतल अव्वल स्थानी आहे.
4) डिव्हिलियर्सच्या परवाणगीने 17 नंबरची जर्सी
ब्रेविसही डीव्हिलियर्सप्रमाणे 360 अंश शैलीत फलंदाजी करू शकतो. तसेच तो डिव्हिलियर्सप्रमाणे 17 नंबरची जर्सी घालतो. जेव्हा ब्रेव्हिस पहिल्यांदा डिव्हिलियर्सला भेटला तेव्हा त्याने 17 नंबरची जर्सी घालण्याची परवानगी मागितली होती.
5) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळण्याची ईच्छा
नुकत्याच एका व्हिडिओमध्ये ब्रेव्हिसने सांगितले होते की, त्याला आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळायचे आहे कारण त्याचा आदर्श खेळाडू डिव्हिलियर्स या संघासोबत खेळला आहे. याशिवाय विराट कोहलीही या संघाचा एक भाग आहे.