लोणी काळभोर – पुणे सोलापूर महामार्गावरील नायगाव पेठ (ता. हवेली) हद्दीत मार्ग वस्तीजवळ सुभाष चौधरी ऊर्फ बाबूतात्या (वय 54) यांच्या खुनाचे गूढ अवघ्या 24 तासांत उलगडण्यास लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. दारू पिण्याच्या वादातूनच बाबूतात्या यांचा खून करणाऱ्या चुलतभावाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक आहे.
सुभाष भगवंत चौधरी (वय 55, रा. वडाची वाडी, नायगाव, ता. हवेली) असे खून झालेल्याचे नाव आहे. संपत तुकाराम चौधरी (वय 46, रा. वडाची वाडी, पेठ, ता. हवेली ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुभाष यांचा मुलगा सौरभ सुभाष चौधरी (वय 23) यांनी फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण म्हणाले की, पुणे सोलापूर महामार्गावरील नायगाव पेठ (ता. हवेली) हद्दीत मार्ग वस्ती जवळ सुभाष चौधरी यांचा मृतदेह शनिवारी (दि. 29) आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त पोलिसांनी केला होता. लोणी काळभोर पोलिसांनी खुनाचे कारण व संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता.
खुनाचा तपास करीत असताना पोलिसांना एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, सुभाष चौधरी आणि आरोपी संपत चौधरी हे चुलत भाऊ आहेत. ते म्हसोबा मंदिरासमोरील मार्ग वस्ती येथे शुक्रवारी सायंकाळी दारू पिण्यास बसले होते. त्यावेळी त्यांच्यात काही कारणावरुन वाद सुरू झाला. हा वाद इतका पेटला की, संपत याने सुभाष याच्या चेहऱ्यावर धारधार शस्त्राने वार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी सुभाष यांचा मुलगा सौरभ चौधरी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी संपत चौधरी याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख करीत आहेत.