मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग कुठे गायब झाले? हा प्रश्न पोलिसांसह राज्य सरकारला पडला आहे. ठाणे न्यायालय आणि मुंबईतील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनीही अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. वारंवार समन्स बजावूनही परमवीर सिंह चौकशीला हजर राहिले नाहीत. त्यामुळे हे वॉरंट बजावण्यात आले आहे. अशावेळी परमवीर सिंह हे बेल्जियममध्ये असल्याचे ट्विट कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी केले. या ट्विटने मोठी खळबळ उडाली आहे.
संजय निरुपम यांनी ट्विट केले की, हे मुंबई पोलिसांचे माजी पोलीस आयुक्त. मंत्र्यावर खंडणी वसुलीचा आरोप लावला होता. स्वत: पाच प्रकरणात वॉन्टेड आहेत. पोलिसांनी म्हटले आहे की हे फरार आहेत. माहिती मिळाली आहे की ते बेल्जियमला आहेत. ते बेल्जियमला कसे गेले? यांना कुणी रस्ता मोकळा करुन दिला? आपण अंडरकव्हर अधिकारी पाठवून त्यांना परत आणू शकत नाहीत का? असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
दरम्यान, परमवीर सिंग यांच्या विरोधात मुंबईसह ठाण्यात वसुलीप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आलेली आहे. मात्र, अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे ठाणे कोर्टानंतर आता मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.