पुणे – आयुष्मान भारत योजनेअंतर्गत राज्यातील एकही पात्र लाभार्थी आरोग्य उपचारापासून वंचित राहू नये. त्यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत संबंधित शासकीय यंत्रणांनी गोल्डन कार्ड नोंदणी आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरण प्रक्रिया गतिमान पद्धतीने राबवावी, असे आवाहन आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केले. मंगळवारपासून गोल्डन कार्डसाठी पॅनलवरील रुग्णालयात विशेष मोहीम सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यावेळी दिले.
विकसित भारत संकल्प यात्रा २०२३ अंतर्गत आयुष्मान भारत, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभुत सुविधांच्या आढावाबाबत बैठक पार पडली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई , क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ. अमोल मस्के, आयुष्मान भारत योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. प्रिती लोखंडे उपस्थित होते.
डॉ. राजेश देशमुख म्हणाले, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी करण्याच्या कामाला विशेष प्राधान्य द्यावे. सीएसई केंद्रांनी या योजनेच्या कामांच्या प्रगतीबाबत दररोजचा अहवाल सादर करावा. पॅनलवरील रुग्णालयांनी गोल्डन कार्ड काढण्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून द्यावी. अधिकाधिक लोकसहभाग घेतांना चांगले काम करणाऱ्या गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांचा प्रत्येक आठवड्यात सन्मान करावा. चांगले काम करणाऱ्या गावांना जिल्हा परिषदेमार्फत पुरस्कार घोषित करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
९ लाख ५ हजार लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड
पुणे जिल्ह्यात आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ३८ लाख ५४ हजार लाभार्थ्यांपैकी ९ लाख ५ हजार लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड वितरित करण्यात आले आहेत. गेल्या महिन्याभरात मोहीम स्तरावर १ लाख ६४ हजार कार्ड वितरित करण्यात आले. विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे या मोहिमेला वेग देण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. प्रिती लोखंडे यांनी दिली.
महापालिका क्षेत्रात नोंदणी वाढवावी
गोल्डन कार्ड नोंदणी आणि वितरणासाठी विशेष नियोजन करावे. महापालिका क्षेत्रात कार्डची नोंदणी कमी असल्याने महापालिकेने गोल्डन कार्डची संख्या वाढविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. या कामाचा दैनंदिन आढावा घ्यावा. धार्मिकस्थळाच्या ठिकाणी मोहिमेसाठी देवस्थान व्यवस्थापनाची मदत घ्यावी, असे डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केले आहे.