बॉलीवूडचा सुपरस्टार अक्षयकुमार सोबत “पृथ्वीराज’ या आगामी चित्रपटातून 2017 मध्ये मिस वर्ल्ड बनलेली मानुषी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.
त्याचबरोबर मानुषी ही महिलांमध्ये एडस् या दुर्धर व्याधीविषयी जनजागृती करण्यासाठीच्या “शक्ती’ या प्रकल्पामध्येही प्रमुख आहे. देशभरात शेकडो महिलांसोबत ती काम करत आहे. याबाबत मानुषी सांगते की, एडस् या व्याधीचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे एडस्चा मुकाबला करणे नितांत गरजेचे आहे. यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.
त्यासाठी आपल्या परीन थोडासा प्रयत्न करण्याचे काम मी करत आहे. आपण अशा महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देऊन त्यांचे सक्षमीकरण करायला हवे, असे मानुषी सांगते. तीन वर्षांपूर्वी मानुषीने “शक्ती’ या प्रकल्पाची सुरुवात केली. देशातील 12 राज्यांमध्ये या प्रकल्पाच्या माध्यमातून काम केले जाते.
त्यांच्याकडे नैसर्गिक फायबरपासून सॅनिटरी पॅड तयार करणाऱ्या मशिन्स आहेत. या सर्वांच्या साहाय्याने आम्ही महिलांसाठी काम करत आहोत, असे ती सांगते. त्यामुळेच मानुषीला “ब्युटी विथ ब्रेन’ असे म्हटले जाते.