“महारेशीममुळे शेतकऱ्यांमध्ये रेशीम उद्योगाबद्दल जनजागृती’

नगर – बदलते हवामान व पर्जन्यमान परिस्थितीमध्ये रेशमी शेती ही शाश्‍वत शेतीसाठी चांगला पर्याय होऊ शकतो. शासनाने नव्याने सुरु केलेल्या धोरणानुसार सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याच्या धोरणामध्ये रेशीम शेतीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीबरोबरच रेशमी शेतीकडेही वळावे.

शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी, रेशीम शेतीचे महत्व कळावे, यासाठी सुरु करण्यात आलेले महारेशीम अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. रेशीम संचालनालय अंतर्गत नगर जिल्हा रेशीम कार्यालयाच्यावतीने दि. 21 जानेवारीपर्यंत महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी रेशीम संचालनालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती असलेला रथ तयार करण्यात आला आहे.

या अभियानाचा प्रारंभ जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रचार रथास झेंडा दाखवून झाले. यावेळी प्रभारी रेशीम विकास अधिकारी बी.डी.डेंगळे, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पी.व्ही इंगळे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी प्रभारी रेशीम विकास अधिकारी बी.डी.डेंगळे म्हणाले, जिल्ह्यात सन 2020-21 करीता 250 एकर तुती लागवडीचा लक्षांत देण्यात आला असनू, या अभियान कालावधीमध्ये जिल्ह्यामधील 14 तालुक्‍यातील निवडक गावात रेशीम शेतीच्या प्रचार-प्रसिद्धीकरीता कार्यक्रम घेऊन प्रत्यक्ष 1000 शेतकऱ्यांबरोबर संवाद साधून त्यामधून योजनेस पात्र अशा किमान 500 एकर नवीन तुती लागवडी करीता लाभार्थी निवड करण्यात येणार आहे. यावेळी रेशीम विभागाचे कर्मचारी सर्वश्री आगम, दळवी, दानवे, टकले, बोरुडे, कांबळे, जायभाय, वाकडे आदि उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.