‘आय. एम .ए’च्या माध्यमातून 27 डॉक्टरांनी सादर केली कला
पिंपरी (प्रतिनिधी) – करोनाविरूद्धच्या लढ्यात जीव धोक्यात घालून अहोरात्र धडपडणाऱ्या डॉक्टरांनी आता “करोना’बाबत जनजागृती सुरु केली आहे आणि ते ही खूपच मनोरंजक पद्धतीने. पिंपरी-चिंचवड शहरातील 27 डॉक्टरांनी एका गाण्याद्वारे प्रबोधन केले आहे. हे गीत सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) पिंपरी-चिंचवड, भोसरी शाखेच्या 27 डॉक्टरांनी आपापल्या घरी किंवा दवाखान्यात राहून नृत्य आणि अभियनाचा मिलाफ साधत हे व्हिडिओ गीत तयार केले. “सर जो तेरा चकराये..’ या सदाबहार हिंदी गीताच्या चालीवर करोनाबाबत जनजागृती करणारे हे गीत तयार केले आहे. “बुखार जैसे पाए..या सर्दी, खासी आए..आजा प्यारे, पास हमारे.. काहे घबराए, काहे घबराए..’ अशी शब्दरचना असलेल्या या गीताची चित्रफीत सध्या सोशल मिडियावर व्हायरल होते आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1215154398824263/
ही संकल्पना “आयएमए’चे सचिव डॉ. सुधीर भालेराव आणि अध्यक्ष डॉ. सुहास माटे यांना सुचली. शब्दरचना डॉ. भालेराव यांनी केली. तर, डॉ. अनिरुद्ध टोणगावकर यांनी गायन केले. गाणं रेकॉर्ड केल्यानंतर त्यावर “आयएमए’च्या डॉक्टरांनी नृत्य व अभिनय करून त्याचा व्हिडिओ तयार केला. रेझोनन्स स्टुडिओचे राजस चव्हाण यांनी या व्हिडिओचे संकलन केले. त्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. दिलीप कामत यांचे मार्गदर्शन लाभले.
डॉ. माटे यांच्यासह असोसिएशनचे माजी अध्यक्ष संजय देवधर, सचिव सुधीर भालेराव, “आयएमए’च्या महिला विभाग अध्यक्षा माया भालेराव, उपाध्यक्ष संजीव दाते, विजय सातव, माजी उपाध्यक्ष सुशील मुथीयान, कोषाध्यक्ष ललित धोका, स्वप्नाली धोका, सचिन कोल्हे, मनिषा डोईफोडे, अर्चना जाधव, संतोष आणि दिपाली लाटकर तसेच आयएमएचे कार्यकारिणी सदस्य मंदार डोईफोडे, हेमंत पाटील, सारिका लोणकर, ज्योती देकाते, संदीप पानसरे, रितू व दिनेश लोखंडे, स्वाती व प्रशांत देशमुख, दिपाली व अनिरुद्ध टोणगावकर, मनीषा व संजीवकुमार पाटील आदी डॉक्टरांनी सादरीकरण केले.
“करोनामुळे निर्माण झालेल्या भयावह स्थितीत देखील डॉक्टर हे प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करीत आहेत. त्याचबरोबरीने करोनाबाबत सामान्य जनतेचे प्रबोधन होणे देखील गरजेचे आहे. या जाणिवेतूनच व्हिडिओची निर्मिती केली आहे.
– डॉ. संजीवकुमार पाटील, कार्यकारिणी सदस्य, आयएमए.