खंडाळा – प्रधानमंत्री आवास योजना व ग्रामीण आवास योजनेतून ११० घरकुल उभारण्याची विक्रमी कामगिरी केल्याबद्दल खेड बुद्रुक ग्रामपंचायतीला खंडाळा पंचायत समितीच्यावतीने तब्बल तीन पुरस्कार प्राप्त झाले.
घरकुल आवास योजनांमध्ये खेड बुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीने गेल्या दोन वर्षात तब्बल १२१ घरकुल मंजूर करण्यात आली असून त्यापैकी ११० लाभार्थ्यांची कामे पुर्ण झाली आहेत. या उत्कृष्ट कामगिरीमुळे या योजनेचा सातारा जिल्ह्यातून सर्वाधिक लाभ घेणारी ग्रामपंचायत खेड बुद्रुक अव्वल ठरली आहे.
आमदार मकरंद पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत खेड बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच गणेश धायगुडे-पाटील व सहकाऱ्यांना या पुरस्कार वितरण करण्यात आले.
या योजना मंजूर होण्यासाठी आमदार मकरंद पाटील, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या अमूल्य सहकार्य व मार्गदर्शनासाठी खेड बुद्रुक ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे आभारी आहे तसेच आणखी नवीन १३० लाभार्थ्यांचेही घरकुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावणार आहे.
– गणेश धायगुडे-पाटील (सरपंच, खेड बुद्रुक)