सुनील राऊत
पुणे – अभय योजनेचा लाभ घेत लाखो रुपयांचा कर माफ करून घेणाऱ्या अनेक मिळकतधारकांनी यंदा पुन्हा महापालिकेचा कर थकविण्यास सुरूवात करत महापालिकेस ठेंगा दाखविला आहे. या 1 लाख 49 मिळकतींमधील केवळ 41 हजार 444 मिळकतींचाच कर महापालिकेकडे जमा झाला आहे. तर 1 लाख 18 हजार मिळकतींचा सुमारे 253 कोटी 47 लाखांचा कर पुन्हा थकला आहे.
शहरातील मिळकतकराची थकबाकी साडेपाच हजार कोटींवर गेली आहे. अनेक मिळकतधारक जादा कर आकारणी, मिळकतकरावर आकारलेले व्याज, दुबार करनोंदणी, न्यायालयीन वाद या कारणास्तव मिळकतकर भरत नाहीत. त्यावर पालिकेकडून दरवर्षी जवळपास 24 ते 25 टक्के व्याज आकारले जाते. त्यामुळे ही थकवाकी वर्षानुवर्षे वाढतच आहे.
ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने मागील वर्षी मिळकतकरासाठी “अभय’ योजना राबवली. त्याअंतर्गत 50 लाखांपेक्षा कमी कर असलेल्या नागरिकांना मिळकतकरावर आकारलेल्या व्याजात 80 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली. या योजनेचा लाभ घेत सुमारे 1 लाख 49 हजार 682 मिळकतधारकांनी तब्बल 485 कोटी 66 लाख 82 हजारांचा कर जमा केला.
आता यंदापासून या मिळकती नियमित कर आकारणीत आल्या. त्यांच्यापासून महापालिकेस 253 कोटी 47 लाख 32 हजार 389 रुपयांचा महसूल मिळणार होता. मात्र, मिळकतकर भरण्यासाठी दिलेल्या सवलतीच्या काळात आतापर्यंत केवळ 41,444 मिळकतींचा 90 कोटी 6 लाख 5 हजार 604 रुपयांचा कर जमा झाला आहे. त्यामुळे मागील वर्षी “अभय’ मिळालेले यंदा कर भरत नसल्याचे चित्र आहे.
मागील वर्षी अभय योजनेत सवलत दिलेल्या मिळकतींचा कर 31 मेपूर्वी जमा होणे अपेक्षित होते. या कालावधीत पालिकेकडून कर सवलत दिली जाते. मात्र, प्रत्यक्षात खूपच कमी मिळकतींचा कर आला आहे. त्यामुळे या मिळकतधारकांना सूचना देण्यात येत आहेत. सवलतीच्या मुदतीत कर न भरल्यास तसेच कर भरण्यास टाळाटाळ होत असल्यास त्याबाबत योग्य निर्णय घेऊ.
– विलास कानडे, उपायुक्त, करसंकलन विभाग.