सातारा – जिल्ह्यातील 64 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 14 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांमध्ये रविवारी सरासरी 85 टक्के मतदान झाले. उद्या, दि. 6 रोजी सकाळी 10 पासून मतमोजणी होणार आहे.
मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संवेदनशील मतदान केंद्रांवर जादा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या. काही मतदान केंद्रांवर झालेले किरकोळ वाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. अनेक मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 वाजल्यापासून रांगा लागल्या होत्या.
ज्येष्ठ नागरिकांसह बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांना आणण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. सकाळी 11.30 पर्यंत सरासरी 38 टक्के मतदान झाले होते; परंतु दुपारी 12 ते 3 या वेळेत मतदानाची आकडेवारी कमी झाली होती. दुपारनंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली.
या निवडणुकीची मतमोजणी उद्या, दि. 6 रोजी सकाळी 10 पासून त्या त्या तालुक्यांच्या ठिकाणी होणार आहे. निवडणुकीचा निकाल तीन तासांत स्पष्ट होईल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळणार? कोण वरचढ ठराणार? कोणी कोणाला दगाफटका केला, याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहेत. मतमोजणीसाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.