परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांना भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची सही असलेली बॅट भेट म्हणून दिली. मार्ल्स यांनी या अनमोल भेटवस्तूबद्दल भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचे आभार मानले आणि सोशल मीडियावर याबाबतचे काही फोटोही शेअर केले आहेत.
एस जयशंकर हे सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री मार्ल्स यांची भेट घेतली. मार्ल्स यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून या भेटीबाबतचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये जयशंकर हे मार्ल्स यांना विराट कोहलीची सही असलेली बॅट भेट देताना दिसत आहेत.
मार्ल्स यांनी पोस्टमध्ये लिहिले की,”कॅनबेरा येथे डॉ. एस जयशंकर यांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आम्हाला एकमेकांविषयी एकत्र बांधतात, यामध्ये क्रिकेटवरील असलेल्या प्रेमाचाही समावेश आहे. आज, भारताचा दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीने सही असलेली बॅट भेट देऊन मला त्यांनी आश्चर्यचकित केले”.
मार्ल्स यांच्या या पोस्टवर खुद्द विराट कोहलीनेही प्रतिक्रिया दिली आहे. हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान असल्याचे विराटने म्हटले आहे. यासोबतच त्याने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचेही आभार मानले आहेत.
A pleasure to host @DrSJaishankar here in Canberra.
There are many things which bind us, including our love of cricket.
Today, he surprised me with a signed bat from cricket legend @imVkohli pic.twitter.com/2FE0qIJnPc
— Richard Marles (@RichardMarlesMP) October 10, 2022
या फोटोंमुळे विराट कोहलीचे चाहते खूपच खूश दिसत आहेत. कारण आपल्या आवडत्या क्रिकेटपटूची सही असलेली बॅट एखाद्या मोठ्या व्यक्तीला अशी भेट म्हणून देणे हॅखूप मोठा सन्मान आहे. कोहली हा असा एक खेळाडू आहे ज्याने आपल्या कर्तृत्वाने केवळ भारतीयांचीच नाही तर जगभरातील लोकांची मने जिंकली आहेत.