#CWC19 : दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ऑस्ट्रेलियाचे पारडे जड

कटू आठवणी पुसण्यासाठी स्मिथ व वॉर्नर उत्सुक

स्थळ- ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
वेळ- सायं.6 वा.

मॅंचेस्टर – साखळी गटात अग्रस्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाची आज येथे दक्षिण आफ्रिकेविरूद्ध लढत होत असून त्यामध्ये कांगारूंचे पारडे जड राहील असा अंदाज आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांना येथील कटू आठवणी पुसण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच उपांत्य फेरी निश्‍चित केली आहे. आफ्रिकेच्या बाद फेरीच्या आशा यापूर्वीच मावळल्या आहेत. हा सामना जिंकून अग्रस्थान कायम राखण्यासाठी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून प्रयत्न होईल.

ऑस्ट्रेलियाने गतवर्षी आफ्रिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यातील केपटाऊन येथे झालेल्या कसोटीत स्मिथ व वॉर्नर यांनी हेतूपूर्वक चेंडू कुरतडल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यामुळे या दोघांवर एक वर्षाकरिता आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली होती.

विश्‍वचषक स्पर्धेपूर्वी त्यांचा बंदीचा कालावधी संपल्यामुळे त्यांना पुन्हा संघात स्थान मिळाले होते. वॉर्नरने आतापर्यंत या स्पर्धेत 516 धावा केल्या असून तो फलंदाजीचा कणाच मानला जातो. स्मिथनेही येथे चांगली चमक दाखविली आहे. या दोन्ही खेळाडूंप्रमाणेच चेंडू कुरतडल्याचा कलंक ऑस्ट्रेलियाच्या माथी आहे. मात्र, अशा प्रसंगांकडे दुर्लक्ष करीत आम्ही फक्त खेळाकडेच लक्ष केंद्रीत करतो हेच कांगांरूनी येथे बाद फेरीत प्रवेश करीत सिद्ध केले आहे.

भारताविरूद्धचा पराभव वगळता ऑस्ट्रेलियाने येथे सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. फलंदाजीत कर्णधार ऍरोन फिंच, ऍलेक्‍स केरी यांनीही चांगले यश मिळविले आहे. गोलंदाजीत मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, ऍडम झंपा, मार्कस स्टोईनिस यांच्यावर त्यांची भिस्त आहे.

आफ्रिकेसाठी मायदेशी जाण्यापूर्वी “चोकर’ हा शिक्का पुसण्याकरिता अखेरची संधी आहे. येथे सर्वच आघाड्यांवर त्यांच्या खेळाडूंच्या मर्यादा स्पष्ट दिसून आल्या आहेत. फलंदाजीत सातत्याचा अभाव ही त्यांच्यासाठी मोठी समस्या आहे. त्यादृष्टीनेच कर्णधार फाफ ड्यु प्लेसिस ,क्विंटन डी कॉक, एडन मरक्रम, हशीम अमला, डेव्हिड मिलर यांच्यावर जबाबदारी आहे. गोलंदाजीत कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, ख्रिस मॉरिस, इम्रान ताहीर यांच्यावर त्यांची भिस्त आहे. क्षेत्ररक्षणात त्यांना कमालीची सुधारणा करण्याची गरज आहे.

प्रतिस्पर्धी संघ-

ऑस्ट्रेलिया – ऍरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, जेसन बेहनड्रॉफ, ऍलेक्‍स केरी (यष्टीरक्षक), नॅथन कोल्टिअर नील, पॅट कमिन्स, नॅथन लायन, ग्लेन मॅक्‍सवेल, केन रिचर्डसन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोईनिस, ऍडम झंपा.

दक्षिण अफ्रिका – फाफ ड्यु प्लेसिस (कर्णधार), एडन मरक्रम, हशीम अमला, डेव्हिड मिलर, जेपी ड्युमिनी, अँडिले फेलुकवायो, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, ख्रिस मॉरिस, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), इम्रान ताहीर, ड्‌वेन प्रिटोरस, तबरेझ शम्सी, रसी व्हॅन डर दुसे.

Leave A Reply

Your email address will not be published.