#CWC19 : ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर 64 धावांनी विजय

-ऍरोन फिंचचे शतक
-स्टोक्‍सचा झुंजार खेळ

लंडन – पहिल्या फळीतील फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळेच इंग्लंडला ऑस्ट्रेलियाकडून 64 धावांनी पराभव पत्करावा लागला. ऍरोन फिंच याच्या तडाखेबाज शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 7 बाद 285 धावा केल्या होत्या. त्यास उत्तर देताना इंग्लंडचा डाव 44.4 षटकांत 221 धावांमध्ये आटोपला. इंग्लंडच्या बेन स्टोक्‍सची झुंज अपुरी पडली. उपांत्यफेरी गाठणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला आहे.

विजयासाठी 286 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. जॉनी बेयरस्टो (27) याच्यासह त्यांनी पहिले चार मोहरे अवघ्या 53 धावांत गमाविले. या स्पर्धेत एकाकी झुंज देणारा त्यांचा भरवशाचा फलंदाज बेन स्टोक्‍स याने जोस बटलर (25) याच्या साथीत संघाचा डाव सावरला. या जोडीने 71 धावांची भागीदारी केली. मार्कस स्टोईनिस याच्या षटकात उस्मान ख्वाजा याने बटलर याचा सुरेख झेल घेतला. स्टोक्‍स याने धावांचा वेग वाढविण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. त्याने दोन षटकारही मारले. तथापि मिचेन स्टार्कने त्याचा त्रिफळा उडवित इंग्लंडला धक्‍का दिला.

स्टोक्‍सने 89 धावा करताना 8 चौकारही मारले. तो बाद झाल्यावर शेवटच्या फळीत ख्रिस वोक्‍स (26) ब आदिल रशीद (25) याचे प्रयत्न निष्फळ ठरले. ऑस्ट्रेलियाच्या जेसन बेहनड्रॉफने 5 गडी तर मिचेल स्टार्कने 4 गडी बाद केले. प्रथम फलंदाजी करताना फिंच याने शतकाबरोबरच डेव्हिड वॉर्नरच्या साथीत केलेली 123 धावांची भागीदारी हेच ऑस्ट्रेलियाच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. फिंच याने 118 चेडूंमध्ये 100 धावा केल्या. शतक पूर्ण झाल्यावर लगेच त्याला तंबूचा रस्ता धरावा लागला. शतकी पाया रचूनही ऑस्ट्रेलियास तीनशे धावांचा पल्ला गाठता आला नाही. उस्मान ख्वाजा (23), स्टीव्ह स्मिथ (38) व अलेक्‍स केरी (नाबाद 38) यांनी केलेले प्रयत्नही त्यासाठी अपुरे होते.

संक्षिप्त धावफलक –

ऑस्ट्रेलिया 50 षटकांत 7 बाद 285 (ऍरोन फिंच 100, डेव्हिड वॉर्नर 53, उस्मान ख्वाजा 23, स्टीव्ह स्मिथ 38, ऍलेक्‍स केरी नाबाद 38, ख्रिस वोक्‍स 2-46).

इंग्लंड 44.4 षटकांत सर्वबाद 221 (जॉनी बेयरस्टो 27, बेन स्टोक्‍स 89, जोस बटलर 25, ख्रिस वोक्‍स 26, आदिल रशीद 25, जेसन बेहनड्रॉफ 5-44, मिचेल स्टार्क 4-43)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.