सुपर-30

जगुन जगाव तर असं जगावं इतिहासानेही एखादं पान आपल्यासाठी राखून ठेवाव असं म्हटलं जात पण हे प्रत्यक्षात जगणारी माणस फार कमी असतात. सर्वसामान्यांत राहून असामान्य कार्य करणारे नावाप्रमाणेच प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद देणारे ‘आनंद कुमार’ एक असं व्यक्तिमत्व की जे आजच्या युवकांचे प्रेरणास्थान आहे.

परिस्थिती हलाकीची असेल तर सर्व अशक्‍य असते असे आपण म्हणतो. परंतु आर्थिक परिस्थितीच जीवनात अनुभव देते आणि जगण्याला कलाटणी मिळते. आनंदकुमार अशाच हलाखीच्या परिस्थितीतून आल्याने अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असूनही पैसा नसल्याने केंब्रीज विद्यापीठात जाण्याचे स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. अशी कितीतरी हुशार मुले जी पैशाच्या कमतरतेमुळे शिकु शकत नाहीत. आनंदकुमार यांनी या गोष्टीवर आपल्या बुद्धीच्या जोरावर मात केली. “सुपर 30′ ही संकल्पना त्यांच्या मनात घर करीत होती. कोणतेही शुल्क न घेता त्यांनी हुशार विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांना सेवाभावीवृत्तीने शिकविण्याचे कार्य केले. फक्त बुद्धीने कुशाग्र असलेल्यांना एकत्र करून 2003 मध्ये पहिले 30 विद्यार्थी आयआयटीमध्ये जाण्यास सक्षम बनविले. त्यानंतर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विद्यापीठांकडून आनंद कुमार यांना बोलाविले जाऊ लागले. त्यांच्या बुद्धिमत्तेची दखल घेण्यात येऊ लागली. गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचे कार्य ‘आनंद कुमार’ यांनी केले.

इच्छाशक्ती असेल तर प्रत्येक असाध्य गोष्ट साध्य करू शकतो याचे उत्तम उदाहरण आनंद कुमार बनले. 2018च्या आयआयटीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी विध्यार्थी पुन्हा एकदा आनंद कुमार यांच्या सुपर30 बॅचमधील निवडले गेले. ‘रामानुजन स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्‍स ‘या’ संस्थेमार्फत तीस विद्यार्थ्यांची निवड करून त्यांचा सर्व खर्च ही संस्था करते. विद्यार्थ्यांना गणिताचे ज्ञान देऊन समाजात एक उत्तम नागरिक म्हणून वावरण्यासाठीचे भान यातून प्राप्त होते. मुळातच परिस्थितीची जाणीव असल्याने येथे येणारे विद्यार्थी हे बुद्धिमत्तेच्या जोरावर आपले ध्येय साध्य करतात आनंद कुमारांना कमी पैशामुळे ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागले ते इतरांना नको त्यासाठी त्यांनी हा नवीन उपक्रम चालू केला. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद व प्रसिद्धी मिळाली. 2009 मध्ये डिस्कवरीने आनंद कुमार यांच्यावर एका तासाची डॉक्‍युमेंट्री फिल्म तयार केली. तसेच न्यूयॉर्क टाइम्समध्ये आनंद कुमार यांच्यावर लेख प्रसिद्ध करण्यात आला. हार्वर्ड सारख्या जागतिक ख्यातीच्या विद्यापीठात त्यांच्या सुपर-30 या कार्याबद्दल माहिती देण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले. आता ‘सुपर 30’ हा उपक्रम राहिला नसून चळवळ झाली आहे.

आईने पापडाचा व्यवसाय करून आनंदला शिक्षण दिले त्याचबरोबर त्यांना माणुसकीचे संस्कार दिले. या संस्कारांमुळेच ते इतरांचे दुःख जाणून घेऊ शकले. शिक्षणाचे बाजारीकरण करणाऱ्यांना आनंद कुमार यांनी गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत ज्ञानावर कोणाचीही मक्तेदारी असू शकत नाही हे दाखवून दिले.

चांगला शिक्षक होण्यासाठी सेवाभावी वृत्ती हवी असते. आजकाल शिक्षणाचे व्यावसायिकरण झाले असून सर्वत्र शिक्षणाचे बाजारीकरण सुरु आहे. मात्र आनंद कुमार यांची सेवाभावीवृत्ती ही शिक्षणाचे बाजारीकरण करणाऱ्यांना चांगलीच चपराक ठरली. केवळ आर्थिक कमजोर असल्याने दर्जेदार शिक्षण न घेऊ शकणाऱ्या हुशार विध्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणाची दारे खुली करून दिली. आजच्या युवकांमध्ये प्रेरणा आत्मविश्‍वास स्फूर्ती निर्माण करून जगण्याची नवी दिशा दिली. आजच्या घडीला त्यांचे विचार, त्यांचे शोधनिबंध असंख्य विध्यार्थ्यांसाठी आदर्श ठरत आहेत. तरुणांच्या या आदर्शाला आमचा सलाम!

– दिपाली जंगम

Leave A Reply

Your email address will not be published.