पंतप्रधान मोदींच्या भेटवस्तूंचा लिलाव; नीरज चोप्राच्या भाल्यासाठी लागली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची बोली

पॅरालिम्पियन जिल्हाधिकाऱ्याच्या रॅकेटसाठी तब्बल 10 कोटींची बोली

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काल 71 वा वाढदिवस देशभरात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त, सांस्कृतिक मंत्रालयाकडून  पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ऑनलाइन लिलाव (ई-लिलाव) आयोजित करत आहे.

ऑनलाईन लिलाव 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरदरम्यान चालणार आहे. या लिलावात सुमारे 1300 वस्तू असतील. यामध्ये पंतप्रधान मोदींना टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक विजेत्यांनी दिलेल्या भेटवस्तूंचाही समावेश करण्यात आला आहे. या भेटवस्तूंमध्ये सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचा भाला आणि पॅरालिम्पिक खेळांचे रौप्यपदक विजेते नोएडाचे कलेक्टर सुहास यतीराज यांच्या बॅडमिंटन रॅकेटचा समावेश आहे.

ई-लिलाव आजपासून सुरू झाला आहे आणि ताज्या अपडेटनुसार, टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या सुहास एलवायच्या रॅकेटसाठी बोली 10 कोटींवर गेली आहे आणि नीरज चोप्राच्या भाल्याचीही सव्वा कोटीपर्यंत बोली लागली आहे. बॉक्सर लव्हलिना बोर्गेहेनच्या ग्लोव्हजची बोलीदेखील 1 कोटी 80 लाखांच्या पुढे गेली आहे.

नीरजच्या भाल्याबरोबरच पॅरालिम्पिक गेम्समध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकणाऱ्या सुमित अँटिलच्या भाल्याची बेस प्राइसही 1 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. या लिलावात अवनी लेखराने स्वाक्षरी केलेल्या टी-शर्टचाही समावेश आहे, तिने पॅरालिम्पिक गेम्समध्ये सुवर्ण आणि कांस्य जिंकले. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या हॉकी संघाच्या स्टिकची मूळ किंमत 80 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कांस्यपदक विजेती बॉक्सर लव्हलिना बोर्गेहेनच्या बॉक्सिंग ग्लोव्हजची मूळ किंमत 80 लाख रुपये आहे.

पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या कृष्णा नगरने स्वाक्षरी केलेल्या रॅकेटची मूळ किंमत 80 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ई-लिलावामध्ये क्रीडा उपकरणे आणि इतर काही खेळाडूंची काही उपकरणेदेखील समाविष्ट आहेत.

या भेटवस्तूंमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या अयोध्या राम मंदिराच्या मॉडेलचाही समावेश आहे. राम मंदिर मॉडेलची मूळ किंमत 10 लाख रुपये आहे. उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी दिलेल्या लाकडी प्रतिकृतीचाही यात समावेश आहे. त्याची मूळ किंमत 5 लाख रुपये आहे.

ई-लिलावातून मिळणारी रक्कम नमामी गंगे मिशनला दिली जाईल. यापूर्वी सप्टेंबर 2019 मध्येही नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टने अनेक गोष्टींचा ऑनलाइन लिलाव केला होता आणि त्याची रक्कम नमामी गंगे मिशनला दान करण्यात आली होती. ज्या कोणालाही या ई-लिलावामध्ये सहभागी व्हायचे आहे ते pmmementos.gov.in ला भेट देऊन नोंदणी करू शकतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.