ठाणे – मद्यालयाचा (बार) परवाना काढताना खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी मुंबई एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी समीर वानखेडे यांनी चौकशीसाठी बुधवारी हजेरी लावली.
समीर वानखेडे यांचे नवी मुंबई येथील वाशी भागात सद्गुरू बार आणि रेस्टॉरंट आहे. वानखेडे यांनी बारचा परवाना 1997मध्ये काढला होता. परंतु त्यावेळी वानखेडे यांचे वय अवघे 17 वर्षे होते. याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्यानंतर विभागाने गुन्हा नोंद करत त्यांच्याकडून खुलासा मागविला होता.
या प्रकरणी वानखेडे यांच्यावर 28 फेब्रुवारीपर्यंत कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी ठाणे पोलिसांना दिले. तसेच बजावण्यात आलेल्या समन्सनुसार शहर पोलिसांसमोर हजर राहून तपासात पूर्ण सहकार्य करेल, असे वानखेडे यांनी न्यायालयाने म्हटले होते.
यानुसार वानखेडे आपल्या वकिलासह बुधवारी सकाळी 11.30 वाजता ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात आपले म्हणणे नोंदवण्यासाठी हजर झाले होते, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यानी दिली.
दरम्यान, हा गुन्हा रद्द करण्यात यावा आणि अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळावे यासाठी वानखेडे यांनी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.