कोलकता – पाकिस्तानातून भारतात आलेली पाकिस्तानी नववधू सीमा हैदरची लग्नाची लगबग जोरात सुरू आहे. ती नशीबवान होती, तिला तिचा प्रियकर तसेच घर मिळाले. मात्र बांगलादेशच्या शापला अख्तरला प्रेमाच्या बदल्यात फसवणूक मिळाली. शिवाय बेकायदेशीरपणे भारतात आल्याने तिला तुरुंगात जावे लागले आहे.
मात्र पोलीस तिच्या प्रियकराचा कसून शोध घेत आहेत. तिच्या प्रियकराने तिला नेपाळला नेऊन विकण्याचा प्रयत्न केल्याचा शापला अख्तरचा दावा आहे. ही घटना पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथील आहे. बांगलादेशी तरुणी शापला बांगलादेशातून काटेरी तार ओलांडून काही महिन्यांपूर्वी डोळ्यात स्वप्ने घेऊन भारतात आली होती.
शापलाचे सिलीगुडी येथील एका तरुणाशी इंटरनेटवर संभाषण झाले होते. तिथून त्यांच्यात मैत्री आणि प्रेम झालं. त्याच प्रेमापोटी शापला रात्रीच्या अंधारात बांगलादेशातून भारतात आली. तिचा ‘बॉयफ्रेंड’ तिला पहिल्यांदा बागडोगराजवळील चहाच्या बागेजवळच्या घरात घेऊन गेला.
सुरुवातीचे काही दिवस शापलाला स्वप्नासारखे वाटले, पण महिन्याभरातच तिला समजले की, या तरुणाने तिला तस्करीच्या उद्देशाने बांगलादेशातून बोलावले होते. सदर तरुणाने तिची नेपाळमध्ये तस्करी करण्याचा कट रचला होता, असा दावा शापलाने केला आहे. यानंतर ती कशीतरी सिलीगुडी गाठण्यात यशस्वी झाली.
एका स्वयंसेवी संस्थेने सिलीगुडी स्थानकावर विमनस्क अवस्थेत भटकताना पाहून शापलाला मदत केली. शापलाचा हा संपूर्ण प्रकार ऐकल्यानंतर एनजीओने तिला प्रधान नगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी शापलाला सिलीगुडी न्यायालयात हजर केले. तेथून तिला भारतात अवैध प्रवेश केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवण्यात आले आहे. पोलीस आता संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.