थेऊर- चार वर्षांपूर्वी झालेल्या वादाच्या कारणांवरून चिडून जाऊन 7 जणांनी एकावर धारदार कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना थेऊर (ता. हवेली) येथे घडली आहे. याप्रकरणी सात जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 17) रविवारी घडली.
वर्कस रोहिदास चव्हाण, सुरेश रोहिदास चव्हाण, अनिल अर्जुन चव्हाण, राजेश प्रकाश चव्हाण, निलेश सुभाष शितोळे, अक्षय साहेबराव चव्हाण व ऋषिकेश चव्हाण (सर्व रा.थेऊर, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर नितीन दत्तात्रय कुंजीर (वय 37, रा.थेऊर, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर म्हणाले की, एका विवाह समारंभासाठी नितीन कुंजीर थेऊर येथील चव्हाणवस्ती येथे गेले होते. त्यावेळी वरील आरोपी तेथे आले व कुंजीर यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. त्यावेळी कुंजीर यांनी डावा हातमध्ये केल्याने डोक्याऐवजी त्यांच्या हातावर मोठी जखम झाली तसेच मारून टाकण्याची धमकी देत मारहाण केली. त्यावेळी लग्नात जमलेले लोक आल्याने ते सर्वजण तेथून निघून गेले. नंतर कुंजीर यांना रूग्णालयात दाखल केल्याचे फिर्यादित नमूद केले आहे.