राहाता – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे यांच्यावर झालेल्या चाकूहल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून संबंधिताने हा हल्ला केला असून या हल्ल्याच्या निषेधार्थ राहाता व साकुरी बंदची हाक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिली होती. त्यास साकुरीत चांगला तर राहाता शहरात अल्प प्रतिसाद लाभला. हल्ल्याप्रकरणी राहाता पोलिसांनी आशिष अशोक पारखे (रा.साकुरी इंद्रनगर) याचेसह इतर अज्ञात दोन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
साकुरी ग्रामपंचायतची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे यांचा भाऊ सचिन हा यानिवडणुकीत उमेदवारी करीत आहे. दि.15 डिसेंबर रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास राजेश लुटे हे त्यांच्या पॅनलमधून उभे असलेल्या महिला उमेदवाराचे पती सुभाष माळवदे यांच्याशी पल्लवी हॉटेलच्या बाहेर उभे राहून निवडणुकीविषयी चर्चा करीत होते. त्या ठिकाणी आशिष अशोक पारखे व त्याचे दोन साथीदार आले.
आशिष पारखे हा राजेश लुटे यांना ओरडून म्हणाला की, तुझी आई सदस्य म्हणून निवडून येते, तू पण मागच्या वर्षी ग्रामपंचायत सदस्य होता. आता तुझ्या भावाला उभे केले आहे. तुझ्या बापाची ठेव आहे का, असे म्हणून शिवीगाळ करून लोखंडी चाकू लुटे यांच्या डोक्यात जोराने मारला. त्यानंतर खांद्यावर चाकूची मूठ जोराने मारली. यामध्ये लुटे यांना गंभीर इजा झाली. डोक्यातून रक्तस्राव होत होता. आरोपी व त्याचे साथीदार तिथून पळून गेले. राहाता येथे प्राथमिक उपचार करून लुटे यांना श्री साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले.
राहाता पोलिसात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे हे करीत आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुकाध्यक्ष गणेश जाधव व शहराध्यक्ष विजय मोगले यांनी शुक्रवारी राहाता व साकुरी शहर बंदची हाक दिली होती. या बंदला साकुरी गावात चांगला तर राहाता शहरात अल्प प्रतिसाद लाभला.
या हल्ल्यामुळे साकुरीत ऐन निवडणुकी दरम्यान तणावपूर्ण शांततेचे वातावरण तयार झाले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष लुटे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत आरोपीला तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली. यावेळी मनसेचे नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल, कोपरगाव तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड, बापूसाहेब काकडे, शिर्डी शहराध्यक्ष लक्ष्मण कोतकर, शिर्डी विद्यार्थी सेनाध्यक्ष प्रशांत वाकचौरे, संदीप लाळे, प्रशांत महाले, सुधाकर वाघमारे, अनिल निकम, भाऊसाहेब सोनवणे, अभिषेक पोकळघट, केतन झिंजाड यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना निवेदन दिले. आरोपींना तत्काळ अटक अटक केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.