सातारा (प्रतिनिधी) : रस्ता डांबरीकरण करण्यासाठी ५० हजारांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून तसेच जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी जिल्हा अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सचिन परशुराम बनसोडे (वय ३०, रा. म्हसवे, ता. सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. ठेकेदार गणेश पवार (रा. करंजे पेठ, सातारा) यांच्याकडे मी ठेकेदार म्हणून काम करत आहेत. काही दिवसांपूर्वी एसटी स्टँन्डजवळील रस्त्याचे डांबरीकरण सुरू होते. त्यावेळी तेथे नरेंद्र पाटील आले. त्यांनी रस्त्याचे काम करायचे असेल तर ५० हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून गणेश पवार यांच्याकडून ५० हजार रुपये घेतले. मात्र, तरीही ते आणखी ५० हजार रुपयांची मागणी करत होते.
दरम्यान, सातारा पालिकेमध्ये सोमवारी रस्त्याच्या डांबरीकरणाचे केलेले बील आणण्यासाठी मी व गणेश पवार गेलो होतो. त्यावेळी तेथे नरेंद्र पाटील होते. ठेकेदार गणेश पवार हे नरेंद्र पाटील यांना म्हणाले, तुम्ही आमचे काम बंद का करीत आहात. त्यावर पाटील म्हणाले, तू मिल्ट्री कॅन्टीनसमोरील रस्त्याच्या कामाचे अजून ५० हजार रुपये दिले नाहीस. तू पैसे दिले नाहीस तर यापुढे काम मिळू देणार नाही व करू देणार नाही. असं म्हणून त्यांनी धक्काबुक्की करून जातिवाचक शिवीगाळ केली.