नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे निर्देश
शिर्डी : वीज वितरणासह कोपरगाव शहर व परिसरातील विकासाची प्रलंबित कामे नियोजनबध्द पध्दतीने तात्काळ मार्गी लावावी, यासाठी सर्व विभागांनी आपापसात ताळमेळ ठेवावा अशी सूचना नगरविकास, ऊर्जा, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, आदिवासी विकास, मदत पुर्नवसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज कोपरगांव येथे केली.
कोरोना संसर्ग निर्मुलन, महावितरण आणि नगरपरिषद तसेच कोपरगांव तालुक्यातील विविध विभागांच्या प्रलंबित प्रश्नावर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगांव तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीस आमदार आशुतोष काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, नाशिकचे अधिक्षक अभियंता श्रीकृष्ण नवलाखे, अहमदनगरचे अधिक्षक अभियंता संतोष सांगळे, कोपरगांव तहसिलदार योगेश चंद्रे, राहाता तहसिलदार कुंदन हिरे, वाहिनी प्रकल्प कार्यकारी अभियंता अनंत पाठक, पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने उपस्थित होते.
राज्यमंत्री तनपुरे यांनी कोरोना संसर्ग विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन व्यापक प्रयत्न करीत आहे, नागरिकांनी भुमिका या कार्यात महत्वाची आहे, असे सांगून कोपरगांव तालुका प्रशासनाने व नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या नियोजनाची आणि प्रयत्नांची प्रशंसा केली. बैठकीत मंत्रीमहोदयांनी कोपरगांव शहर व परिसरातील विकास कामांचा आढावा घेतला आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगांव विधानसभा मतदार संघातील प्रलंबित कामे व चालू असलेल्या कामांची माहिती मंत्रीमहोदयांना सांगितली. तसेच सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करण्याची सूचना केली.
या बैठकीला मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, कोपरगांवचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष विधाटे, विशेष वैद्यकीय अधिकारी वैशाली आव्हाड (बडदे), वैद्यकीय अधिक्षक कृष्णा फुलसौंदर, पोलिस निरीक्षक राकेश मानगांवकर, महावितरण उपकार्यकारी अभियंता दिनेश चावडा, भगवंत खराटे, तुषार सुर्यवंशी यांच्यासह विविध खातेप्रमुख, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, कोपरगांव नगरपरिषदेचे नगरसेवक उपस्थित होते. प्रास्ताविक कोपरगांव तहसिलदार योगेश चंद्रे यांनी तर सुत्रसंचालन आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके यांनी केले. आभार शंकरराव काळे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पद्मकांत कुदळे यांनी मानले.