तळेगाव ढमढेरे (पुणे) – शिरूर तालुक्यातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या टाकळी भीमा (ता. शिरूर) या गावचा माजी सरपंच रवींद्र दोरगे याच्यासह त्याची पत्नी आणि वडिलांवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमिनीच्या व्यवहारात फसवणूक करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
रवींद्र बाळासाहेब दोरगे असे या माजी सरपंचाचे नाव आहे. तर त्याचे वडील बाळासाहेब दोरगे व पत्नी (नाव माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत दीपक चंद्रमणी आल्हाट (रा. तळेगाव ढमढेरे बाजारतळ, ता. शिरूर; सध्या रा. सिद्धार्थ कॉलनी, चेंबूर, मुंबई) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी- तळेगाव ढमढेरे येथील दीपक आल्हाट यांची तळेगाव ढमढेरे येथील गट नंबर 1391 मधील जमीन जानेवारी 2019मध्ये विकत घेतली होती. जमीन खरेदी करताना दोरगे याने आल्हाट यांना जमिनीच्या किमतीच्या रकमेचे धनादेश दिले होते. आल्हाट यांनी धनादेश बॅंकेत भरल्यानंतर धनादेश वटले नाहीत. त्यामुळे आल्हाट यांनी वारंवार दोरगे याच्याशी संपर्क करून पैशांची मागणी केली. दोरगे वेगवेगळ्या तारखा देऊ लागला. त्यानंतर आल्हाट यांची जमीन दोरगे याने इतर व्यक्तींना विक्री केल्याबाबत माहिती मिळाली, त्यामुळे आल्हाट यांनी जमिनीचे दस्त काढून पाहणी केली असता, दोरगे याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आल्हाट यांचे पैसे न देता त्या जमिनीची शरद रामदास संकपाळ (रा. कळवंतवाडी आंबळे ता. शिरूर), सविता सुरेश जगताप (रा. खराडी पुणे) व वीरसेन बाळकृष्ण गायकवाड (रा. दत्ता चौक, मुंढवा पुणे) यांना जमिनीची विक्री केल्याचे समजले. त्यामुळे जमिनीचे मूळ मालक दीपक आल्हाट व त्यांच्या नातेवाइकांनी टाकळी भीमा येथे जाऊन रवींद्र दोरगे यांच्याकडे पैशांची मागणी केली असता दोरगे याने आल्हाट व त्यांच्या नातेवाइकांना जातीवाचक शिवीगाळ केली.
यावेळी दोरगे यांचे वडील बाळासाहेब दोरगे व पत्नी हे त्याठिकाणी आले आणि त्यांनीदेखील सर्वांना जातीवाचक शिवीगाळ करत दमदाटी केली. मुख्य आरोपी रवींद्र दोरगे हा फरार झाला असून, पुढील तपास दौंडचे प्रभारी उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे व पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार हे करीत आहेत.