भारत पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रात सुपरपॉवर होऊ शकतो

संयुक्तराष्ट्र सरचिटणीसांचे प्रतिपादन

संयुक्तराष्ट्र – स्वच्छ उर्जा आणि वातावरणातील बदल या क्षेत्रात भारताला जागतिक नेतृत्व करण्याची संधी आहे. भारताने परंपरागत इंधन स्त्रोतांपेक्षा अपारंपरीक उर्जा स्त्रोतांचा वापर वाढवल्यास भारत पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रात सुपरपॉवर होऊ शकतो असे प्रतिपादन संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्टोनिओ गुटेर्रेस यांनी केले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, करोना महामारी आणि वातावरणातील बदल यामुळे जगातल्या लोकसंख्येचे कल्याण आणि आरोग्य कसे सुरक्षित राखायचे असा मोठा प्रश्‍न सध्या निर्माण झाला आहे. याचा मुकाबला करण्यासाठी जगातील सर्वच देशांनी एकमेकांना सहकार्य करून यावर उपाययोजना केली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

आज वातावरण बदलाच्या संबंधात ठोस उपाययोजना करून अत्यंत धाडसाने नेतृत्व करणाऱ्या देशांची गरज आहे. हे काम भारत देश उत्तम पद्धतीने करू शकतो असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. एनर्जी ऍन्ड रिसोर्सेस इन्स्टिट्युट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या दरबारी सेठ स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारताचे विदेश मंत्री एस. जयशंकर हे होते.

गुटेर्रेस म्हणाले की, भारताने कार्बन आधारीत इंधनाचा वापर कमी करून सौर उर्जेसारख्या अपारंपरीक उर्जा स्त्रोतांचा वापर वाढवला तर भारताला या क्षेत्रात जगात नेतृत्व करण्याची मोठी संधी आहे. भारत हे काम करू शकेल असा मला विश्‍वास आहे. 

करोना महामारीच्या काळातही भारताने अपारंपरीक उर्जेचे उत्पादन 17 टक्‍क्‍यांवरून 24 टक्के इतके वाढवले आहे ही समाधानाची बाब आहे. कोळशाचा वापरही त्यांनी 76 टक्‍क्‍यांवरून 66 टक्के केला आहे असेहीं गुटेर्रेस यांनी निदर्शनाला आणून दिले. हा एक चांगला बदल आहे असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.