जेवढी मते पडतील तितकी रक्कम विजयी कार्यकर्त्याला
भिगवण – जिल्ह्यातील लक्षवेधी ठरलेल्या इंदापूर विधानसभा निवडणुकीत अटीतटीची लढत होणार आहे. या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असताना आता राष्ट्रवादी आणि भाजप पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये पैजा लावल्या जात आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार दत्तात्रय भरणे यांच्या चुरस पाहता पैजेचा विडा रंगला आहे. जंक्शन (ता. इंदापूर) येथील कार्यकर्त्यांनी लावली आहे.
इंदापूर तालुक्यातील प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी अद्याप निवडणुकीचे फॉर्म अद्याप भरले नाहीत. तरी सध्या एका पैजेची जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या गावागावांत निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. यातूनच आपल्या नेत्यांवरील प्रेमापोटी पैज लावली जात आहे. ही पैज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
यामध्ये जो नेता जास्त मतांनी निवडून येईल, त्याने विजयी झालेल्या उमेदवाराच्या कार्यकर्त्याला तेवढीच रक्कम देण्याचे पैंजेमध्ये ठरले आहे. ही पैंज भाजपाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे यांच्या लढतीत लावण्यात आली आहे.
जंक्शन येथील कार्यकर्त्यांनी ही पैज लावली आहे. नितीन भारत साबळे (हर्षवर्धन पाटील कार्यकर्ता) आणि सोमनाथ भारत बनसोडे (दत्तात्रय भरणेंचा कार्यकर्ता) या दोघांनी लावली आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर वीस दिवसांच्या आत पैसे देण्याचे यामध्ये ठरविण्यात आले आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघातील नेत्यांसाठी नेत्यांच्या प्रेमापोटी कार्यकर्त्यांनी स्वतःच्या दुचाकींची पैंज चर्चेत आली होती. सध्या निवडणुकीत नेत्यांच्या प्रेमापोटी आता इंदापूर तालुक्यातील ही पैंज चांगलीच चर्चेत आली आहे.