गणेश घाडगे
माधव पॅटर्न पुढे आणण्याचा प्रयत्न : घुलेंकडून राष्ट्रवादी जीवंत करण्याचा आटापिटा
नेवासा – नेवाशात सध्या राजकीय गणिते अत्यंत वेगाने बदलत आहेत. माजी आ. शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादी सोडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळेल, या आशेवर तालुका पिंजून काढला आहे. मात्र तालुक्यात लंघे की माजी आमदार पांडुरंग अभंग? अशी चर्चा सुरू आली आहे.
तालुक्यात अभंग यांच्या रूपाने माधव पॅटर्न राबवला, तर आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना निवडणूक अवघड होणार आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही माजी आमदार चंद्रशेखर घुले व माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या रूपानेच मुरकुटे यांचा विजय सुकर झाल्याची चर्चा आहे.
यावेळी घुले बंधूंकडूनही अभंग यांचे नाव पुढे करून राष्ट्रवादी जीवंत करण्याचा आटापिटा सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नेवाशात तिरंगी लढत रंगण्याचे संकेत मिळत आहेत. तालुक्यात माळी समाज 46 हजार, धनगर समाज 16 हजार, वंजारी समाज तीन हजार, मुस्लिम समाज 33 हजार, मागासवर्गीय समाज 60 हजार असल्याने अभंग यांचे नाव तालुक्यात वेगाने चर्चेला येऊ लागले आहे. त्यामुळे हवेवरच्या या तालुक्यात पुन्हा एकदा 1995 सालची पुनरावृत्ती होणार का ? राष्ट्रवादीच्या उमेदवारापुढे मुरकुटे-गडाख यांचे कडवे आव्हान असणार, हे नक्की असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी मात्र ज्ञानेश्वरची यंत्रणा सरसावली असल्याचे बोलले जात आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि राष्ट्रवादीला गळती लागली. पराभवाचे खापर घुले बंधूंच्या डोक्यावर फोडत माजी आमदार शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. तेंव्हापासून नेवाशाततील राष्ट्रवादी घुले बंधूंच्या भवतीच फिरू लागली.
2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी एखादा कार्यक्रम घेतला असल्याचे चित्र अजूनपर्यंत पाहायला मिळाले नाही. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात घुले बंधूंची झालेली पीछेहाट, यामुळे 2019 च्या निवडणुकीत माजी आमदार शंकरराव गडाख यांनी क्रांतिकारी पक्षाच्या रूपाने अपक्ष दाखल केलेला अर्ज, यामुळे घुले बंधूंना राष्ट्रवादी पक्षाकडून स्वंतत्र उमेदवार देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तालुक्यात तिरंगी लढत होण्याचे चिन्ह निर्माण झाले आहेत.
राज्यात राष्ट्रवादीला घरघर लागली आहे. त्यातच माजी जिल्हाध्यक्षांच्या तालुक्यात देखील ती सपुष्टात येऊ नये, म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी पायाला भिंगरी लावून तालुका पिंजून काढला आहे. लंघे उमेदवारी करण्यावर अजूनतरी ठाम नसल्याचे दिसत असल्याने घुले बंधूंच्या अडचणींत वाढ झाली आहे. मात्र उमेदवारी दाखल करण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक राहिले, तरी राष्ट्रवादी पक्षाकडून अजूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याने नेवासा तालुक्यात राष्ट्रवादीकडून उमेदवारी विठ्ठलराव लंघे की माजी आमदार पांडुरंग अभंग, कोणाला मिळणार ? की अन्य कुणाला देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अभंग यांच्या रूपाने तालुक्यात माधव पॅटर्न राबवण्याचे व राष्ट्रवादी पक्ष जीवंत ठेवण्यासाठी माजी आमदार व राष्ट्रवादीचे माजी जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांचा आटापिटा चालू आहे. घुले बंधूंच्या या प्रयत्नमुळे तसेच आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यावरील भाजपतील नाराज व नेवासा शिवसेना पक्षाची देखील मदत होणार असल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. त्यामुळे तालुक्यात तिरंगी लढत रंगणार असल्याचे चित्र दिसत आहे.
उशिरा सुरु केले प्रयत्न
2019 ची निवडणूक जाहीर होऊन अनेक दिवसांचा कालावधी उलटला, तरी देखील नेवासे मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात चंद्रशेखर घुले अपयशी ठरले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असताना देखील माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्यासाठी घुले यांनी भेंडा कारखान्यावर बैठक आयोजित केल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे उशिरा प्रयत्न सुरु केल्याची चर्चा सुरू आहे.