हेरत (अफगाणिस्तान) :- अफगाणिस्तानातील पश्चिमेकडील भागात एका मशिदीमध्ये स्फोट होऊन आज 20 जण ठार झाले, तर 21 जण जखमी झाले. मृतांमध्ये एका प्रमुख मौलवीचा समावेश आहे. तालिबान संघटनेने ही माहिती दिली. हेरातमधील एका गजबजलेल्या मशिदीत शुक्रवारच्या दुपारच्या नमाजासाठी गर्दी झालेली असताना हा स्फोट झाला. ( At Least 20 Killed as Explosion Strikes Mosque in Herat, Afghanistan )
सध्या अफगाणिस्तानात धार्मिक सप्ताह चालू असल्याने मशीद व परिसरात मोठी गर्दी होती. त्यावेळी स्फोट झाल्याने मोठी जीवितहानी झाली. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.
या स्फोटात मुजीब-उल रहमान हा मौलवी ठार झाला. तो तालिबानी प्रवत्तीचा होता. अफगाणिस्तानात पाश्चात्य राष्ट्रांच्या अधिपत्याखाली सत्ता स्थापन झाली होती, तीवर टीका करण्यात तो अग्रभागी होता. बंडखोरांचा शिरच्छेद करणे, दगडाने ठेचून मारणे, हात कापणे अशा शिक्षा द्यायला हव्यात, असे तो उघडपणे म्हणत असे. त्या कारणासाठीच तो संपूर्ण अफगाणिस्तानात प्रसिद्ध होता. त्याच्या मृत्यूमुळे संघटनेचे मोठे नुकसान झाले, असे तालिबानचा प्रमुख प्रवक्ता झबिउल्ला मुहाजिद याने म्हटले आहे.
हेरात येथील या मशिदीत सुन्नी पंथाचे अनुयायी प्रार्थनेसाठी प्रामुख्याने येत असतात. अफगाणिस्तानात सत्तेवर असलेल्या तालिबानमध्येही याच पंथाचे अनुयायी आहेत. गेल्या वर्षी त्यांची सत्ता आल्यापासून शिया पंथियांच्या मशिदींमध्ये शुक्रवारच्या नमाजावेळी आत्मघाती स्फोट होण्याचे प्रमाण वाढले होते. या देशात शिया व सुन्नी या पंथांच्या अनुयायांमध्ये सतत चकमकी होत असतात. यामध्ये आजवर हजारो निरपराध नागरीक मारले गेले आहेत.