वॉशिंग्टन – अमेरिकेतील उद्योगांनी गेल्या ऑगस्ट महिन्यात नोकरभरतीमध्ये तब्बल 40 टक्क्यांची कपात केली आहे. वाढलेले व्याजदर, मोठी चलनवाढ आणि ग्राहकांकडून कमी खरेदी या कारणांमुळे तेथील अर्थव्यवस्था किंचित मंदावली असल्याने उद्योग क्षेत्राने सावधगिरी बाळगली आहे.
अमेरिकेच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये तेथे 3 लाख 15 हजार नोकऱ्या उपलब्ध झाल्या. जुलैमध्ये हा आकडा 5 लाख 26 हजार इतका होता. त्यापूर्वीच्या 3 महिन्यांच्या सरासरीपेक्षाही ऑगस्टमधील आकडा कमी आहे. अमेरिकेतील बेरोजगारीचा दर सध्या 3.7 टक्के झाला आहे. जुलैमध्ये तो 3.5 टक्के होता.
ऑगस्टमध्ये नोकऱ्या कमी उपलब्ध झाल्या असल्या, तरी जेवढ्या आहेत, त्यांवर फेडरल रिझर्व्ह समाधानी आहे. रोजगारवाढ व वेतनवाढ व्हावी, असे फेडचे सतत प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच खरे तर कर्जांवरील व्याजदर वाढविण्यात येत आहेत. वेतनवाढ झाल्यास त्या खर्चाची भरपाई करण्यासाठी उद्योगांकडून वस्तूंची दरवाढ करण्यात येईल आणि त्यातून चलनवाढ होईल. व्याजदर वाढविल्यास या चलनवाढीस आळा घालता येईल, असे फेडचे गणित आहे.
अर्थात, फेडने व्याजदर फार वाढवल्यास अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊन ती मंदीकडे सरकू लागेल, अशी भीती काही अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या तरी नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि ले-ऑफचे प्रमाण कमी आहे, त्यावरून अनेक उद्योगांना नोकरभरती करायची असल्याचे दिसून येते. त्यामुळे सध्या तरी अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीत नाही, असे त्यांचे मत आहे.