Pune | रस्त्यावरील डीपीत हात घातल्याने सहायक प्राध्यापकाचा तडफडून मृत्यू; जर्मन बेकरीसमोरील घटना

-संजय कडू

पुणे – रस्त्याच्याकडेला असलेल्या महावितरणच्या डीपीत दोन्ही हात घातल्याने एकाचा तडफडून मृत्यू झाला. ही घटना विधी महाविद्यालयाजवळील जर्मन बेकरीसमोर गुरुवारी दुपारी घडली. मृत व्यक्ती त्रिवेंद्रम येथील एका महाविद्यालयातील माजी सहायक प्राध्यापक आहे. तो पुण्यात का आला होता ? व त्याने असे कृत्य का केले याचा शोध डेक्कन पोलीस घेत आहेत. किरण राजकुमार(रा.त्रिवेंद्रम, केरळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी दिलेल्या माहितीनूसार, किरण राजकुमार हा दुपारी तीनच्या सुमारास जर्मन बेकरीसमोरील पदपथावरुन एकटाच बडबड करत चालला होता. रस्त्याने जात असताना त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरणच्या डीपीचे दरवाजे उघडले.

यानंतर त्याने दोन्ही हात डीपीमध्ये घातले. यामुळे वीजेचा तीव्र शॉक बसून तो रस्त्यावर फेकला गेला. काहीवेळ तडफडल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. ही घटना रस्त्यावरुन जाणाऱ्या दोन ते तीन नागरिकांनी बघितली होती. त्यांनी तातडीने डेक्कन पोलिंसांना फोन करुन माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यावर त्याला ससून रुग्णालयात नेले. तेथे तपासणीअंती त्याला मृत घोषीत केले.

त्याच्याकडे वाहनाचे आरसी बुक सापडले. त्यावरुन त्याच्या घरचा पत्ता आणी फोन नंबर शोधण्यात आला. त्याच्या घरच्यांशी संपर्क साधण्यात आला असून ते दोन ते तीन दिवसांत पुण्यात दाखल होत आहेत. त्याची अधिक माहिती काढली असता, तो त्रिवेंद्रममधील एका महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. त्याला व्यसन लागल्याने महाविद्यालयातून काढण्यात आले होते. यानंतर तो पुण्यात कधी व कसा आला ही माहिती मिळू शकली नाही. त्याच्या खिशात गाडीची चावी होती, यावरुन गाडीचा शोधही घेण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.