भोपाळ – करोनाच्या काळात रोज नवनवीन धक्कादायक घटना ऐकायला मिळत आहेत. रूग्णांसाठीच्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असतानाच आहेत त्या सुविधाही मनमानी पध्दतीने काढून घेतल्या जात आहेत. अशाच एका घटनेत मध्य प्रदेशात एका रूग्णाला आपले प्राण गमवावे लागले.
मध्य प्रदेशच्या शिवपुरी येथील कोविड सेंटरमध्ये झालेल्या या घटनेत वॉर्डबॉय रूग्णाला लावलेला ऑक्सिजन काढताना दिसून आला. त्यामुळे रात्री 11 वाजेपर्यंत चांगला असलेला रूग्ण अत्यवस्थ होऊन सकाळी दगावला.
सुरेंद्र शर्मा असे त्याचे नाव असून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. रूग्णालयाच्या म्हणण्यानुसार संबंधित रूग्णाची प्रकृती अगोदरच खालावली होती. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
मात्र कुटुंबियांनी जेव्हा सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली तेव्हा झाला प्रकार उघड झाला. संबंधित वॉर्डबॉयने चक्क ऑक्सिजनची नळी काढून नेल्याचे समोर आले आहे.
जेव्हा रूग्णाचा मुलगा सकाळी हॉस्पिटलमध्ये गेला तेव्हा त्याला त्याचे वडील तळमळताना दिसले. त्याने ताबडतोब मदतीसाठी याचना केली. कोणीही मदतीला आले नाही. त्यामुळे अखेर त्यानेच पित्याला खांद्यावर टाकून अतिदक्षता विभागात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
वॉर्डबॉयने ऑक्सिजन काढण्याची कृती कोणाच्या सांगण्यावरून केली? तशी कृती करण्याचे कारण काय, याची चौकशी करून 48 तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.