जालना – ट्रान्सफाॅर्मर बदलून देण्यासाठी शेतकऱ्याकडे खासगी एजंटमार्फत पाच हजारांची लाच घेताना महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. संदीप लक्ष्मणलाल जैसवाल (सहाय्यक अभियंता महावितरण, वाटूर) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. जैसवाला याला मंठा तालुक्यातील वाटुर फाटा येथून अटक केली आहे.
तक्रारदार शेतकऱ्याच्या शेतातील ट्रान्सफाॅर्मर गेल्या काही दिवसांपूर्वी जळाला होता. तो बदलून देण्यासाठी रिपोर्टवर सही करण्यासाठी यातील तक्रारदार यांच्याकडे खाजगी एजंटमार्फत अभियंता जैसवाल यांनी सहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती पाच हजार रुपये स्विकारण्याचे मान्य करून एॅडव्हान्स म्हणून दोन हजार रुपये घेण्यात आले. आणि उर्वरीत तीन हजार रुपये जैसवाल याने स्वीकारले. यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी जैसवाल याला रंगेहात अटक केली. लाचलुचपत कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.