डेहराडून – विधानसभा निवडणुकीसाठी उत्तराखंडमध्ये मतदान झाल्यानंतर सत्तारूढ भाजपच्या प्रदेश शाखेत अस्वस्थतेचा भडका उडाला आहे. भाजपच्या काही उमेदवारांनी स्वपक्षीयांकडून दगाफटका झाल्याचे जाहीर आरोपसत्र सुरू केले आहे. उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 14 फेब्रुवारीला मतदान झाले. तेथील निकाल 10 मार्चला जाहीर होणार आहे. त्यामुळे निकालासाठी आणखी तीन आठवडे प्रतीक्षा करावी लागणार आहे.
यावेळच्या निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेसमध्ये अटीतटीची लढत झाल्याचे मानले जाते. भाजपला सत्ता राखणे सोपे जाणार नसल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटते. अशात त्या पक्षाच्या चार उमेदवारांनी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामध्ये तीन आमदारांचाही समावेश आहे. स्वपक्षीयांनीच आपल्या पराभवासाठी हालचाली केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने उत्तराखंड शाखेतील अस्वस्थतेची दखल घेतली आहे. कुठली गाऱ्हाणी असल्यास जाहीर वाच्यता न करता पक्षाच्या व्यासपीठावर भूमिका मांडण्याची सूचना उत्तराखंडमधील नेत्यांना देण्यात आल्याचे समजते. उत्तराखंडमध्ये एकीकडे भाजपमधील अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे. तर, दुसरीकडे कॉंग्रेसकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे.