इस्लामाबाद – पाकिस्तानच्या एका माजी मुत्सद्याच्या कन्येची इस्लामाबादेत हत्या करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानच्या राजदूताच्या कन्येचे अपहरण पाकिस्तानमध्ये झाले होते. त्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच ही घटना घडली आहे.
पाकिस्तानचे माजी मुत्सदी अधिकारी शौकत मुकादम यांची 27 वर्षीय कन्या नूर मुकादम हिचा मृतदेह राजधानी इस्लामाबादेतील उच्चभ्रू भागामध्ये मंगळवारी आढळून आला. तिची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचे उघड अझाले आहे, असे वृत्त पाकिस्तानातील आघाडीच्या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले आहे.
या प्रकरणी नूर मुकादमच्या जहीर जाफर नावाच्या एका मित्राला घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. शौकत मुकादम हे पूर्वी दक्षिण कोरिया आणि कझाकस्तानमध्ये पाकिस्तानचे राजदूत म्हणून नियुक्त होते.
उच्चपदस्थ अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेवरून पाकिस्तानमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. अफगाणिस्तानचे पाकिस्तानातील राजदूत नजिबुल्लाह अलिखिल यांची कन्या सिलसिला अलिखिल हिचे 16 जुलै रोजी इस्लामाबादेतच अपहरण करण्यात आले होते. या मुद्द्यावरून अफगाणिस्तानने पाकिस्तानातील राजदूतांना माघारी बोलावले आहे.