Jakarta : पुरुषांच्या 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल स्पर्धेत अव्वल स्थान मिळवून सुवर्ण कामगिरी केल्यानंतर एका दिवसानंतर, भारताच्या योगेश सिंगने सोमवारी(दि.15) जकार्ता, इंडोनेशिया येथे आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेमध्ये 25 मीटर सेंटर फायर पिस्तूल प्रकारात आणखी एक सुवर्णपदक जिंकले.
भारतीय नेमबाजाने नॉन-ऑलिम्पिक डिसिप्लिन प्रकारात अचूक टप्प्यात(precision stage) 288 आणि वेगवान टप्प्यात(rapid stage) 285 अशा एकूण 573 गुणांसह 10 खेळाडूंमध्ये अव्वल स्थान पटकावले. ओमानच्या मुआद अल बलुशीने 570 गुणांसह रौप्यपदक जिंकले, तर इंडोनेशियाच्या अनंग युलियान्टोने 567 गुणांसह कांस्यपदक जिंकले.
या स्पर्धेतील इतर भारतीय नेमबाजांपैकी, पंकज यादव युलियान्टो इतक्याच 567 गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला. तरीहि तो पदक मिळवू शकला नाही. कारण, भारतीय नेमबाजाने इंडोनेशियन नेमबाजाच्या 15 एक्सच्या तुलनेत 10 एक्स शाॅटस(अचून शाॅट्स) मारले. इतर भारतीयांमध्ये अक्षय जैन 564 गुणांसह सहाव्या स्थानावर तर राकेश सुरेश कदम, फक्त रँकिंग पॉइंट्ससाठी (आरपीओ) स्पर्धा करत 560 गुणांसह आठव्या स्थानावर राहिला.
#AsianOlympicQualifiers : नेमबाज योगेश सिंगची सुवर्ण कामगिरी…
भारत सध्या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2024 मध्ये 15 सुवर्ण, 10 रौप्य आणि आठ कांस्य अशा 33 पदकांसह पदकतालिकेत अव्वल आहे. भारतीय नेमबाजांनी या स्पर्धेतून चार पॅरिस 2024 ऑलिम्पिक कोटा देखील मिळवला आहे.