Hangzhou (China) : तब्बल 72 वर्षांनंतर प्रथमच भारताने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्ण जिंकलंं आहे. (Asian Games 2023: Avinash Sable Becomes First Indian To Win Gold Medal In 3000m Steeplechase)
महाराष्ट्रातील (Maharashtra) बीड जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या धावपटू अविनाश साबळे (Avinash Sable) याने चीन येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस विभागात स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
या स्पर्धेतील हे पहिले सुवर्ण आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा 1951 मध्ये सुरू झाली आणि तेव्हापासून 3000 मीटर स्टीपलचेस (पुरुष) स्पर्धा सुरू झाल्या, परंतु भारताच्या एकाही खेळाडूने त्यात सुवर्ण जिंकले नव्हते.तर ही कामगिरी करणारा अविनाश साबळे हा पहिला भारतीय ठरला आहे.
अविनाश साबळे याने 72 वर्षांची ही प्रतीक्षा संपवली आहे. हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे अॅथलेटिक्समधील चौथे पदक आहे. याआधी किरण बालियानने महिलांच्या शॉटपुटमध्ये कांस्य, कार्तिक कुमारने पुरुषांच्या 10 हजार मीटर शर्यतीत रौप्य आणि गुलवीर सिंगने कांस्यपदक जिंकले होते.
अविनाशने 8:19:50 च्या वेळेसह सुवर्णपदक जिंकले. तथापि, शेवटच्या 100 मीटरमध्ये त्याने जे पराक्रम गाजवले ते या खेळांच्या इतिहासात क्वचितच पाहिले गेले होते. 8:19:50 ची वेळ देखील आशियाई क्रीडा स्पर्धेत विश्वविक्रम बनली आहे.
अविनाश हा राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासातील 3000 मीटर स्टीपलचेस (पुरुष) मध्ये भारताचा पहिला पदक विजेता आहे. त्याने 2022 मध्ये बर्मिंगहॅममध्ये रौप्य पदक जिंकले होते. त्याच वेळी, तो आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 3000 स्टीपलचेसमध्ये भारताचा पहिला सुवर्णपदक जिंकणारा खेळाडू आहे.
एशियाडमध्ये आतापर्यंत कोणत्या भारतीयांनी पदके जिंकली आहेत?
यापूर्वी पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये अजित सिंगने 1951 दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले, दलू रामने 1954 मनिला आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य, गुरमेज सिंगने 1970 बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक, गुरमेज सिंगने 1974 तेहरान आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. सैनीने बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक, गोपाल सैनीने 1982 दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक, दिना रामने 1990 बीजिंग आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक, नवीम कुमारने 2014 इंचॉन आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.आता अविनाश साबळे हा नववा पदक विजेता ठरला आहे. 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये भारताचे हे पहिले सुवर्ण आहे.
जपान सर्वात यशस्वी देश…
पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सर्वात यशस्वी देश जपान आहे. त्याने 10 सुवर्ण जिंकले आहेत. त्याचबरोबर कतार, बहारीन आणि पाकिस्तानने प्रत्येकी दोन सुवर्णपदक जिंकले आहेत. भारत आणि इराणला प्रत्येकी एक सुवर्णपदक मिळाले आहे.