शिर्डी – साई संस्थांनच्या देणगी कार्यालयात संगणकाच्या माध्यमातून व विशिष्ट शाईचा वापर करून बनावट देणगी पावत्या तयार करून त्या भाविकांना देऊन मोठा गैरव्यवहार झाल्याची घटना समोर आली आहे. संस्थानने या प्रकरणाची दखल घेत शनिवारी रात्री देणगी कार्यालयातील दशरथ चासकर या कर्मचाऱ्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आणखी आरोपी असण्याची दाट शक्यता असून, हा गैरप्रकार नेमकी किती महिने सुरू होता. यात कोण कोण सामील आहे, याचा सखोल तपास पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ हे करत आहे.
शिर्डीत दररोज देश-विदेशातून अनेक भाविक साईसमाधी दर्शनासाठी येत असतात. बाबांच्या प्रति असलेली श्रद्धा व प्रेम यामाध्यमातून अनेक भाविक सोने, चांदी, हिरे, तसेच रोख रकमेची देणगी देत असतात. ही रक्कम ऑनलाइन, चेकद्वारे तथा रोख स्वरुपात देणगी कार्यालयात भाविक जमा करतात. त्यांना देणगी कार्यालयातून साई संस्थांनच्या नावाने पावती दिली जाते, परंतु ही पावती संगणकाच्या साहाय्याने देताना त्याच पावतीची दुसरी नकली पावती हुबेहुब बनवून भाविकांना देऊन त्यांना गंडा घालण्याचा कारभार अनेक दिवसांपासून सुरू होता.
भोळ्या भाबड्या भाविकांना याचा संशय सुद्धा येत नव्हता. कारण खरी पावती व नकली पावती सारखीच आणि एकाच संगणकातून बनवत असल्याने सहसा लक्षात येत नव्हते. मात्र, हा गैरप्रकाराचा एका भाविकाला संशय आला. त्याने निनावी पत्राद्वारे संस्थान प्रशासनाकडे तक्रार केली. वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी या प्रकरणाची संस्थान प्रशासनाने चौकशी केली व प्रशासनाला यात तथ्य आढळले. तरीसुद्धा हे प्रकरण अनेक दिवस दाबून ठेवण्यात आले होते. या घटनेविषयी पहिले वृत्त प्रसिद्ध करून दैनिक प्रभातने या गंभीर प्रकरणाला वाचा फोडली.
या घटनेचे तीव्र प्रतिसाद शिर्डी तसेच जिल्ह्यात व राज्यात उमटले. त्यानंतर मात्र संस्थानने या प्रकरणाची दखल घेत शनिवारी रात्री देणगी कार्यालयातील दशरथ चासकर या कर्मचाऱ्यांविरोधात भादवी कलम 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यातच शिर्डीतील एका माजी स्वीकृत नगरसेवकाने आरतीचा पास विकल्याचे प्रकरण समोर आल्याने आता नगरसेवकाच्या पास विक्रीच्या काळाबाजारा विरोधात शिर्डी पोलीस गुन्हा का दाखल करत नाही, याची मोठी चर्चा शिर्डीत सुरू आहे.
साई संस्थानच्या देणगी कार्यालयातील अपहार व आरती पासचा काळाबाजार करून भाविकांची फसवणूक करणाऱ्या प्रकरणाची सखोल पोलीस चौकशी सुरू आहे. तपास करून दोषींवर कडक कारवाई करणार आहे.
संदिप मिटके , पोलीस उपअधीक्षक, शिर्डी