Asia Cup 2023 Pakistan vs Bangladesh : आशिया कप 2023 च्या सुपर फोर फेरीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यातील विजयासह पाकिस्तानने अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 38.4 षटकांत सर्वबाद 193 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने 39.3 षटकांत तीन गडी गमावून 194 धावा केल्या आणि सामना सात विकेटने जिंकला.
पाकिस्तानकडून फलंदाजीत इमाम उल हकने सर्वाधिक 78 आणि मोहम्मद रिझवानने नाबाद 63 धावा केल्या. बांगलादेशकडून गोलंदाजीत तस्किन, शॉरीफुल आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
सुपर फोरमध्ये पोहोचलेल्या चार संघांमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश व्यतिरिक्त भारत आणि श्रीलंकेचे संघ आहेत. सुपर फोरमधील दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.
तत्पूर्वी, सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 38.4 षटकात सर्वबाद 193 धावा केेेेेेल्या होत्या.बांगलादेशकडून फलंदाजीत मुशफिकर रहीमने सर्वाधिक 64 धावा केल्या तर कर्णधार शाकिबने 53 धावांची खेळी खेळली. मोहम्मद नईमने 20 धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही.
भारताविरुद्धच्या सामन्यात सर्व 10 बळी घेत इतिहास रचणाऱ्या पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांनी या सामन्यातही नऊ विकेट्स घेतल्या. हरिस रौफने सर्वाधिक चार तर नसीम शाहने तीन विकेट घेतल्या. शाहीन आफ्रिदी आणि फहीम अश्रफ यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. इफ्तिखार अहमदलाही एक विकेट मिळाली.