#AsiaCup2023 #INDvSL #Final : अखेर आशिया चषक 2023 ची सांगता झाली. 19 दिवस चाललेल्या या स्पर्धेत 13 सामने खेळले गेले. भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेचा डाव अवघ्या 50 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 6.1 षटकात 10 विकेट्स राखून हा सामना जिंकत आठव्यांदा आशिया कपवर आपले नाव कोरलं आहे.
भारताकडून शुभमन गिल 19 चेंडूत 27 धावा करून नाबाद राहिला आणि इशान किशन 18 चेंडूत 23 धावा करून नाबाद राहिला. शुभमनने सहा चौकार तर ईशानने तीन चौकार मारले.
टीम इंडियाने आठव्यांदा हे (AsiaCup) विजेतेपद पटकावले. यापूर्वी भारताने 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016 आणि 2018 मध्ये विजेतेपद पटकावले होते. भारताने ही स्पर्धा वनडेमध्ये सात वेळा आणि टी-20मध्ये एकदा जिंकली आहे, तर श्रीलंकेच्या संघाने सहा वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. श्रीलंकेने वनडेमध्ये पाच वेळा आणि टी-20मध्ये एकदा विजेतेपद पटकावले आहे. पाकिस्तान संघ दोन वेळा चॅम्पियन बनला आहे.
तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय वेगवान गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय चूकीचा ठरवला. मोहम्मद सिराज आणि हार्दिक पांड्याच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतानं श्रीलंकेचा डाव अवघ्या 50 धावांत गुंडाळला.
श्रीलंकेचा संपूर्ण संघ 15.2 षटकात 50 धावांवर गारद झाला. भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी, याच वर्षी जानेवारीमध्ये भारताने श्रीलंकेला 22 षटकांत 73 धावांत गुंडाळले होते. इतकंच नाही तर भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात कोणत्याही संघाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी बांगलादेशचा संघ 2014 मध्ये मीरपूरमध्ये भारताविरुद्ध 58 धावांंवर आटोपला होता. 50 धावा ही कोणत्याही एकदिवसीय अंतिम फेरीतील सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी 2000 मध्ये शारजाह येथे भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध 54 धावांत ऑलआऊट झाला होता.आता श्रीलंकेने यापेक्षाही कमी धावसंख्या उभारली आहे. म्हणजेच श्रीलंकेने केलेली 50 धावांची धावसंख्याही आशिया चषकातील किमान धावसंख्या आहे.
आजच्या सामन्यात भारताकङून गोलंदाजीत सिराजने सर्वाधिक सहा विकेट तर हार्दिकने 3 आणि बूमराहनं 1 विकेट घेतली. सिराजने पहिल्यांदाच वनडेत पाच विकेट्स घेतल्या आहेेत.
चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सिराजने पथुम निसांकाला रवींद्र जडेजाकडून झेलबाद केले. यानंतर तिसऱ्या चेंडूवर सदिरा समरविक्रमा एलबीडब्ल्यू आऊट केलं. चौथ्या चेंडूवर त्याने चरित असलंकाला इशान किशनकरवी झेलबाद केले. मात्र, त्याची हॅटट्रिक हुकली. पाचव्या चेंडूवर चौकार गेला. यानंतर अखेरच्या चेंडूवर सिराजने धनंजय डी सिल्वाला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. त्यानंतर त्याने सहाव्या षटकात दासून शनाका आणि बाराव्या षटकात कुसल मेंडिसला बाद केले. अशाप्रकारे सिराजनं सहा बळी घेतले.
हार्दिक पांड्यानेही तीन बळी घेतले. त्याने दुनिथ वेललागे, मदुशन आणि पाथिराना यांच्या विकेट घेतल्या. बुमराहने परेराची विकेट घेतली. श्रीलंकेच्या सर्व 10 विकेट भारतीय वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. सिराजने सात षटकांत 21 धावा देत सहा बळी घेतले. त्याचवेळी हार्दिकने 2.2 षटकांत तीन धावा देऊन तीन बळी घेतले, तर बुमराहने पाच षटकांत 23 धावांत एक विकेट घेतली.
श्रीलंकेला दहावा धक्का…
15 व्या षटकात हार्दिक पांड्यानं पहिल्या व दुस-या चेंङूवर सलग दोन धक्के देत श्रीलंकेचा ङाव अवघ्या 50 धावांवर संपुष्टात आणला. त्याआधी श्रीलंकेला 12.3 व्या षटकात 40 धावांवर 8वा धक्का बसला. हार्दिक ने वेलालगे याला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद करत श्रीलंकेला आठवा धक्का दिला. त्यापूर्वी,श्रीलंकेला 12व्या षटकात 33 धावांवर सातवा धक्का बसला. सिराजने कुसल मेंडिसला क्लीन बोल्ड केले. त्याला 17 धावा करता आल्या. त्याने 34 चेंडूंच्या खेळीत तीन चौकार मारले. मेंडिस हा एकमेव फलंदाज आहे जो आतापर्यंत दुहेरी आकडा गाठू शकला आहे.
श्रीलंकेला सहाव्या षटकात 12 धावांवर सहावा धक्का बसला. सिराजने कर्णधार दासुन शनाकाला क्लीन बोल्ड करत श्रीलंकेला 6वा धक्का दिला. त्याला खातेही उघडता आले नाही. याआधी सिराजने चौथ्या षटकात सहा चेंडूत चार बळी घेतले. प्रथम, त्याने चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पथुम निसांकाला रवींद्र जडेजाकडून झेलबाद केले. निसांकाला चार चेंडूत दोन धावा करता आल्या. यानंतर तिसऱ्या चेंडूवर सदिरा समरविक्रमा एलबीडब्ल्यू आऊट केलं. चौथ्या चेंडूवर सिराजनं चरित असलंकाला इशान किशनकरवी झेलबाद केले. मात्र, त्याची हॅटट्रिक हुकली.
पाचव्या चेंडूवर चौकार गेला. यानंतर अखेरच्या चेंडूवर सिराजने धनंजय डी सिल्वाला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. निसांकाला दोन तर धनंजयला चार धावा करता आल्या. त्याचवेळी समरविक्रमा आणि असलंका यांना खातेही उघडता आले नाही. तत्पूर्वी, बुमराहने पहिल्याच षटकात कुसल परेराला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले होते. परेराला खातेही उघडता आले नाही.