Asia Cup 2023 Super 4 Match Sri lanka vs Bangladesh : आशिया चषक स्पर्धेतील सुपर-4 च्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशला पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेने 21 धावांनी त्यांचा पराभव केला.
बांगलादेशचा सुपर-4 मधील हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी पाकिस्तानविरुद्धही पराभव झाला होता. श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर आता बांगलादेश संघाचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
बांगलादेशचा संघ 258 धावांच्या लक्ष्यासमोर 48.1 षटकात 236 धावांवर गारद झाला. श्रीलंकेने हा सामना 21 धावांनी जिंकला. सुपर-4 मधील त्याचा हा पहिलाच सामना होता आणि त्यांनी दोन गुण मिळवले.
दुसरीकडे बांगलादेशला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या सामन्यातही पाकिस्तानने त्यांचा पराभव केला होता. त्याचे दोन सामन्यांत शून्य गुण आहेत आणि त्याचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.
बांगलादेशकडून फलंदाजीत तौहीदने सर्वाधिक 82 धावा केल्या. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. मुशफिकुर रहीम (२९ धावा), मेहदी हसन मिराझ (२८ धावा) आणि मोहम्मद नईम (२१ धावा) यांनी चांगली सुरुवात केली पण त्यांना मोठी खेळी खेळता आली नाही. लिटन दासला केवळ 15 धावा करता आल्या तर कर्णधार शकीब अल हसनला केवळ तीन धावा करता आल्या. श्रीलंकेकडून गोलंदाजीत मथिशा पाथिराना, दासून शनाका आणि महिश तिक्शिना यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
तत्पूर्वी,सदिरा समरविक्रमा (93) आणि कुसल मेंडिस (50) यांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने 50 षटकांत 9 गडी गमावून 257 धावा केल्या. बांगलादेशने नाणेफेक जिंकून यजमान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
समरविक्रमाने 72 चेंडूंत खेळलेल्या खेळीत आठ चौकार आणि दोन षटकार ठोकले. मेंडिसने 73 चेंडूंच्या खेळीत सहा चौकार आणि एक षटकार लगावला. पथुम निसांकाने 40 धावांचे योगदान दिले. मात्र, दमदार सुरुवात केल्यानंतर श्रीलंकेचा संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला.
बांगलादेशकडून गोलंदाजीत हसन महमूदने 9 षटकात 57 धावा देताना तीन बळी घेतले. तस्किन अहमदने 10 षटकात 62 धावा देत 3 विकेट घेतल्या तर शरीफुल इस्लामने 8 षटकात 48 धावा देताना दोन गडी बाद केले.